छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील वाळूज भागात पत्नीपीडित पुरुष आश्रम आहे. जागतिक पुरुष दिनाचे निमित्त साधून या आश्रमात पुरुषांना छळणाऱ्या महिलांचा अनोखा निषेध नोंदविण्यात आला. शीर्षासन आंदोलन पुरुष सक्षमीकरणाच्या घोषणा देण्यात आल्या.

८ मार्च हा जागतिक महिला दिन सर्वांच्याच लक्षात असतो. मात्र जागतिक पुरुष दिन १९ नोव्हेंबरला असतो, याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते. भारतीय संविधानानुसार स्त्री-पुरुषांना समान दर्जा दिला पाहिजे. मात्र आज पुरुषांना डावलून केवळ महिलांसाठी वेगवेगळे कायदे बनवून महिला सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाऊन पुरुषांना अगदी दुर्बल बनवले गेले आहे. पुरुषांवर अन्याय झाल्यास कुणी दखल घेत नाही. समाज समजून घेत नाही. पोलीस महिलांच्या बाजूने असतात. न्याय व्यवस्था देखील पुरुष अत्याचारावर गप्प बसते हे सर्व उलटे सुरू झाले त्यामुळे पत्नीपीडित पुरुषांनी जागतिक पुरुष दिनी पत्नीपीडित पुरुष आश्रमात स्वतःला उलटे करून घेतले. शासन सरळ उभे राहून आमचे ऐकत नाही त्यामुळे आम्ही आज रोजी उलटे झालो, अशी प्रतिक्रिया आंदोलनावेळी या आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. भारत फुलारे यांनी दिली. आंदोलनात सचिव चरणसिंग गुसिंगे, सदस्य वैभव घोळवे, एकनाथ राठोड, संजय भांड, संदीप सातपुते, कारभारी कुकलारे, अमोल हातकंगणे, विशाल नांदेडकर, प्रवीण कांबळे, हर्षवर्धन दिवे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्नीपीडित पुरुष उपस्थित होते.

या आंदोलनाबद्दल ॲड. भारत फुलारे म्हणाले, की कायदे बनवताना पुरुष अबला होणार नाही याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आता महिला सबला तर पुरुष अबला झाला आहे. स्त्री पुरुष समानता करता करता स्त्रीने केव्हा पुरुषांना गुलाम बनवले हे कळलेच नाही. भारत हा पुरुष प्रधान संस्कृतीचा देश मानला जातो. त्यामध्ये आता स्त्रिया राजा झाल्या व प्रधानाला गुलाम बनवले. भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटला. परंतु या एकतर्फी कायद्यामुळे पुरुष महिलांच्या गुलामगिरीच्या विळख्यात अडकला आहे . त्यासाठी आता पुरुष सबलीकरण करण्याची गरज आहे.
बहुतांश पत्नी पीडित हे पत्नीच्या जाचाला कंटाळून व समाजात न्याय न मिळाल्याने हताश होऊन आत्महत्या करताना दिसत आहे. त्यामुळे लिंग भेद न करता कायदे बनवले गेले पाहिजेत. पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण दिले गेले पाहिजे. सद्यस्थितीत स्त्रियांच्या बाजूने असलेल्या भरमसाठ कायद्याचा आधार घेत स्त्रियांनी फक्त स्वतःची प्रगतीच केली नाही तर पुरुषांना गुलाम बनवण्यासाठी त्या कायद्याचा गैरवापर करणे सुरू केला, असे फुलारे म्हणाले. विवाह बंधन हे एक पवित्र बंधन असताना त्याचे रूपांतर व्यवसायात होत चालले आहे. एकत्र कुटुंबपद्धत बुडाली असून विवाहावरचा युवकांचा विश्वास उडत जाऊन भारत पाश्चात्य संस्कृतीचे अवलंब करताना दिसत आहे, असे ते म्हणाले. पत्नीपीडित पुरुष आश्रमात होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाची चर्चा शहरात होत असते.