छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी) : जिल्ह्यातील 9 मतदारसंघांसाठी आज, 20 नोव्हेंबरला मतदान झाले. यातून 183 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल, तेव्हा 9 आमदार कोण, हे समोर येईल. जिल्ह्यात सरासरी 69 टक्के मतदान झाले. सिल्लोडमध्ये सर्वाधिक 75 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मतदानाचे हायलाइट्स
28 बॅलेट युनीट, 16 कंट्रोल युनीट आणि 29 व्हीव्हीपॅट मशीन व्यवस्थित काम करत नसल्याने बदलण्यात आल्या. या काळात काही काळ मतदान थांबवावे लागले. असे सर्वाधिक प्रकार फुलंब्री मतदारसंघात घडले. छत्रपती संभाजीनगर मध्य आणि पूर्व व पैठण, गंगापूर, सिल्लोडमध्येही हे प्रकार समोर आले.
शहरात तणावाच्या घटना
नारेगाव, शिवाजीनगर, ब्रिजवाडी, गारखेड्यातील मतदान केंद्राबाहेर दोन गटांत झालेल्या राड्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जिल्हाभरात 7 हजार 815 पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. जवाहरनगर भागात मतदानासाठी एका पक्षाच्या कार्यालयात पैसे वाटप सुरू असल्याची अफवा पसरली होती. त्यांच्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत पोलीसही पोहोचले. पण तसा काही प्रकार नव्हता. त्यामुळे तणाव निवळला.
शिवाजीनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू शाळेत बोगस मतदान सुरू असल्याची अफवा पसरली. एमआयएम व भाजप कार्यकर्ते मतदान केंद्राकडे आले. दोन्ही आमनेसामने ठाकले. पोलिसांनी त्यांना पिटाळले. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सकाळपासूनच संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
बजाजनगरात लाठीमार
सायंकाळी पाचला बजाजनगर येथील अल्फोन्सा शाळा मतदान केंद्राजवळील लोकांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे संतप्त ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनी तिथेच ठिय्या दिला. सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांनी त्यांची समजूत काढली. या मतदान केंद्राबाहेर राजू शिंदे यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते फोटो काढत असताना गर्दी पाहून पोलिसांनी लाठीमार केला होता. यात तिघे जखमी झाले. आ. संजय सिरसाट यांच्या सांगण्यावरून लाठीमार केल्याचा आरोप राजू शिंदे यांनी केला.
आ. शिरसाट म्हणाले, मस्ती आली का, नीट करील साल्या…
गुरू तेग बहादूर मतदान केंद्रावर आ. संजय शिरसाट यांना ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी मशाल दाखवत चिडवले. त्यामुळे शिरसाट यांनी मस्ती आला का, नीट करील साल्या, असे म्हणत या कार्यकर्त्यांना धमकावले. नितीन पवार व त्यांचे साथीदार आ.शिरसाटांना मशाल दाखवत होते. शिरसाट हे नितीन पवारकडे गेले. तरीही ते घोषणा देत होते. त्यामुळे शिरसाट यांनी दम भरला. आ. अंबादास दानवे यांनी घटनास्थळी येऊन नितीन पवार व इतर कार्यकर्त्यांची चौकशी केली.