दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी मुंबईतील प्रभादेवी परिसरातील त्यांचा आलिशान फ्लॅट भाड्याने दिला आहे. हा फ्लॅट ब्यू मोंडे टॉवर्समध्ये २४ व्या मजल्यावर आहे आणि त्याचे मासिक भाडे ७ लाख रुपये आहे. फ्लॅटचे क्षेत्रफळ २ हजार ३१० चौरस फूट आहे.
असे म्हणतात की हा इतका पॉश परिसर आहे की येथे सिद्धिविनायक मंदिरदेखील आहे. दीपिका, रणवीरने फ्लॅट भाड्याने देताना २१ लाख रुपयांचे डिपॉझिटही घेतले आहे. या फ्लॅटसाठी तीन कार पार्किंग देखील आहे आणि भाडे करार १३ नोव्हेंबरलाच झाला. ३६ महिन्यांसाठी फ्लॅट भाड्याने देण्यात आला आहे. पहिल्या १८ महिन्यांसाठी ७ लाख रुपये आणि उर्वरित १८ महिन्यांसाठी ७ लाख ३५ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. दीपिका पदुकोणचा ब्यू मोंडे टॉवर्समध्येच आणखी एक फ्लॅट आहे. याशिवाय सागर हौसिंग सोसायटीत तिचा एक अलिशान फ्लॅट आहे. जो शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याजवळ आहे.
दीपिका आणि रणवीरला एक चिमुकली मुलगी आहे. ८ सप्टेंबर २०२४ रोजी दीपिकाने या मुलीला जन्म दिला होता. रणवीर सिंगने बँड बाजा बारात या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. राम-लीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत, सिम्बा आणि गली बॉय यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत रणवीरने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. उत्तम अभिनयकौशल्य, हटके स्टाईल आणि फॅशन ही रणवीरची खासियत आहे. इंडस्ट्रीतील यशामुळे रणवीर सिंगच्या कमाईतही सातत्याने वाढ होत आहे. रिपोर्टनुसार, त्याची एकूण संपत्ती सुमारे २४५ कोटी रुपये आहे.
प्रत्येक चित्रपटासाठी रणवीर ३० कोटी रुपयांचं मानधन घेतो. त्यामुळे रणवीर बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याव्यतिरिक्त ब्रँड ॲन्डॉर्समेंटमुळे त्याच्या उत्पन्नात वाढ होते. अनेक जाहिरातींमधूनसुद्धा रणवीर भरघोस कमाई करतो. मात्र, रणवीरच्या एकूण संपत्तीचा विचार केल्यास दीपिकाच्या संपत्तीपेक्षा त्याची कमाई कमीच आहे. दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असून तिची एकूण संपत्ती ५०० कोटी रुपये आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण आलिशान जीवन जगत असून त्यांचा मुंबईमध्ये ११९ कोटींचा लग्झरिअस फ्लॅट आहे. रणवीरकडे रेंज रोव्हर, ॲस्टन मार्टिन, जग्वार, मर्सिडीज-बेंझ आणि लॅम्बोर्गिनी या गाड्यांचं कलेक्शन आहे.