छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : नरेंद्र मोदींचा नोकर असलेल्या निवडणूक आयोगाने जेवढ्या तत्परतेने माझा पक्ष आणि चिन्ह चोरून दुसऱ्याला दिले. त्या तत्परतेने मतदारसंघांची नावे का बदलली नाहीत ? छत्रपती संभाजीनगर असे शहराचे नामांतर करून आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले म्हणता पण संभाजीनगर कुठे आहे, नामांतर केले असेल तर मग मतदारसंघाचे नाव आजही औरंगाबाद कसे, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरातील जाहीर सभेत आज, १४ नोव्हेंबरला रात्री केला.

शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची सभा झाली. व्यासपीठावर माजी खासदार चंद्रकांत खैरे, मिलिंद नार्वेकर, आ. अंबादास दानवे यांच्यासह जिल्ह्यातील मविआचे उमेदवार उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, की आज मोदी इथे येऊन थापा मारून गेले. शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले असे ते म्हणाले. मात्र, नामांतराचा ठराव आमच्या सरकारच्या शेवटच्या कॅबीनेटमध्येच आम्हीच मंजूर केला होता.

आज ते म्हणत असतील की त्यांनी नामांतर केले, तर मला विचारायचे आहे की कुठे आहे संभाजीनगर ? मतदारसंघाची नावे तर औरंगाबादच आहेत. मोदी कुठे आले होते औरंगाबाद पूर्वमध्ये की औरंगाबाद मध्यमध्ये?, असे टीकास्त्र ठाकरे यांनी सोडले. आम्ही चिकलठाणा विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजीराजे विमानतळ करण्याचा ठरावही केला. पण तुम्ही ते नामांतर केले नाही, असेही ठाकरे म्हणाले. मी लोकांसाठी लढतोय. आज महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता पायदळी तुडवली जात आहे. तिच्या रक्षणासाठी मी लढत आहे. मुख्यमंत्रीपदाचे खुळ माझ्या डोक्यात नाही, असेही ते म्हणाले.

आपले सरकार येणार तेव्हा सोयबीन विका…
आज सोयाबीनला चांगला भाव नाही. माझे शेतकऱ्यांना सांगणे आहे की सोयाबीन आताच विकू नका. आपले सरकार येणार आहे तेव्हा ६ हजार रुपये हमी भाव देणार आहोत. त्यावेळी सोयाबीन विका. त्यासाठी आधी आपले सरकार आणा, असे आवाहनही त्यांनी केले. नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या ठाकरे यांनी एमआयएमविरुद्ध ब्रही काढला नाही. बॅग तपासणीवर त्यांनी भाष्य केले. ठाकरे यांची सभा साडेसहाला होती. मात्र सहापर्यंतही कार्यकर्ते सभास्थळी जमलेले नव्हते. सहानंतर मात्र लगेचच गर्दी होत गेली. अनेकांच्या हाती मशाली दिसल्या. रात्री आठला ठाकरे यांचे आगमन होऊन सव्वा आठला त्यांनी भाषण सुरू केले, ते २५ मिनिटे चालले.