छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माजी आमदार किशनचंद तनवाणी अखेर आज, १४ नोव्हेंबरला सकाळी शिंदे गटात दाखल झाले. ते समर्थकांसह शिंदे गटात जाणार असल्याचे वृत्त यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी समर्थकांसह प्रवेश केला.
तनवाणी यांना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली होती. मात्र जैस्वाल त्यांचे मित्र असल्याने त्यांनी आधी त्यांची माघारीची वाट पाहिली, पण त्यांनी प्रतिसाद न दिल्याने अखेर त्यांनीच मैदानातून काढता पाय घेत उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली. यामुळे ठाकरे गटाची मोठीच अडचण झाली. ऐन उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी ठाकरे गटाने निष्ठावान पदाधिकारी बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. त्यानंतर आ. अंबादास दानवे यांनी तनवाणी यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली होती. तनवाणी यांनी नंतर ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देत उद्धव ठाकरे यांना शेवटचा जय महाराष्ट्र केला. त्यांच्या १८ समर्थक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले.
तनवाणी आणि त्यांचे समर्थक शिंदे गटात जाणार असल्याचे सूतोवाच छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने केले होते. ते वृत्त तंतोतंत खरे ठरत अखेर तनवाणी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत सचिन झव्हेरी, सोमनाथ बोंबले, सुधीर नाईक, आदित्य दहिवाल याही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी जैस्वाल म्हणाले, की तनवाणी माझे प्रामाणिक मित्र असून ते ज्या पक्षात असतात त्या पक्षाचे ते प्रामाणिकपणे काम करतात. शहराचे हित लक्षात घेऊन त्यांनी ठाकरे गटाने दिलेली उमेदवारी परत केली. यासाठी त्यांनी पैसे घेतल्याचा आरोप खोटा आहे. तनवाणी यांच्यामुळे आपले मताधिक्य आणखी वाढणार आहे, असा दावा त्यांनी केला. पक्षप्रवेश सोहळ्यावेळी आ. जैस्वाल यांच्यासह खा. संदिपान भुमरे, आ. संजय शिरसाट यांचीही उपस्थिती होती.
माहेश्वरी समाजाचा जैस्वालांना पाठिंबा…
छत्रपती संभाजीनगरातील माहेश्वरी समाज आणि गुजराती समाजाने आज प्रदीप जैस्वाल यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देण्याआधी समाजाने शहरातील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. जैस्वाल यांच्यासोबतच पूर्वचे भाजप उमेदवार अतुल सावे, पश्चिम मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांनाही जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.