छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज, १४ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगरात विराट जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना बाजूला ठेवत थेट काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेस ही आरक्षणाच्या विरोधात असून, आजवर त्यांनी आरक्षणाला विरोध केला आहे आणि आजही त्यांचा तोच अजेंडा असल्याचा आरोप मोदी यांनी केला. छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण केलेल्या आणि प्रगतिपथावर असलेल्या योजनांची माहितीही त्यांनी देत मराठवाड्याला पुढील ५ वर्षांत विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याची ग्वाही दिली. छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या इंडस्ट्रीयल पार्कमुळे भविष्यात मोठ्या रोजगार संधी निर्माण होणार असल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील उमेदवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास आठवले, डॉ. भागवत कराड, संजय केणेकर, खा. संदिपान भुमरे, शिरीष बोराळकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रॅहम फर्थच्या मैदानावर दुपारी सभा झाली. सभेला दोन्ही जिल्ह्यांसह मराठवाड्यांतून हजारो लोक आले होते. सभास्थळी लोकांना बसायलाही जागा उरली नाही. अनेकांनी उभे राहून मोदी यांचे भाषण ऐकले. छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज लाइव्ह प्रक्षेपणाची सोय केली होती. त्याला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले.

काँग्रेसला कायमच मागास लोकांचा विकास खटकला आहे. त्यामुळे १० वर्षांपासून एक ओबीसी समाजाचा व्यक्ती पंतप्रधान झाल्याचे त्यांना खटकत असल्याचा आरोपही मोदी यांनी केला. काँग्रेस कायम जातीजातीत भांडणे लावत आली आहे. आताही त्यांचा तोच इरादा आहे. लोक जाती-जातींत विभागले की आपोआपच ताकद कमी होते. त्याचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असतो. त्यामुळे लोकांनी एक राहावे. एक आहोत तर सुरक्षित आहोत… असे म्हणत त्यांनी एक है तो सेफ है, असे म्हणताच नागरिकांनी गजर करत एक है तो सेफ है, अशा घोषणा दिल्या. कश्मिरमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मिटविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून, त्यासाठी त्यांनी ३०७ कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव पारित केला आहे, असे मोदी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना आणली होती. या योजनेमुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार होता. मात्र मध्येच अडीच वर्षांसाठी महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांनी ही योजना बंद केली. मात्र जेव्हा महायुतीचे सरकार पुन्हा आले, तेव्हा हे काम पुन्हा सुरू करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महायुती सरकारने १६०० कोटींची पाणी योजना आणली. याही योजनेवर महाविकास आघाडीच्या लोकांनी स्थगिती आणली. आता ही योजना जेव्हा पुन्हा सुरू केली गेली आहे. आता या योजनेची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासाठी केंद्र सरकार ७०० कोटी रुपये देत आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली.