छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी महिलांनी योगदान द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे आज महिला मतदार जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या मेळाव्यास मार्गदर्शन केले. ऐश्वर्या आघाव, डॉ. रश्मिता श्रीनिवासन, डॉ. अर्चना राणे, अर्चना गायकवाड, आशाताई शेरखाने, संगिता देशपांडे, श्रीमती बोर्डे अशा विविध क्षेत्रातील मान्यवर महिला तसेच मनपा उपायुक्त अंकुश पांढरे, स्वप्निल सरदार, संजीव सोनार आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, आपल्याला मिळालेले अधिकार, हक्क लोकशाही मुळे मिळाले आहेत. हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लोकशाही बळकट करण्यासाठी आपले योगदान देणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. महिलांमध्ये महिलांनी मतदानविषयक जनजागृती करुन योगदान द्यावे,असे आवाहनही स्वामी यांनी केले.
उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनीही महिलांशी संवाद साधून मतदानाचा अधिकार बजावण्याबाबत आवाहन केले. प्रास्ताविक स्वप्निल सरदार यांनी केले तर अंकुश पांढरे यांनी आभार मानले. संजीव सोनार यांनी सूत्रसंचलन केले.