वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळू वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर वाळू माफियांच्या टोळीने हल्ला चढवला. तुफान दगडफेक केली. यात दोन्ही शेतकरी जखमी झाले. या प्रकरणी विरगाव पोलिसांनी वाळूमाफियाच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील अव्वलगाव शिवारात मंगळवारी (१२ नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास घडली.
गणेश कारभारी उगले (वय ३८, रा. अव्वलगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांची गट नं. १४४ अव्वलगाव शिवारात वडिलोपार्जीत अडीच एकर जमीन आहे. मंगळवारी (१२ नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास ते व त्यांचे काका गोविंद कचरू उगले (रा. अव्वलगाव) शेतातील विहिरीतील मोटार चालू करण्यासाठी गेले असता गोदावरी नदीच्या कडेला उभे असताना तेथे ओळखीचा संदीप वाघमारे (रा. खंडाळा ता. श्रीरामपूर हा त्याची स्कॉर्पीओ कार घेऊन आला. कारमध्ये त्याचे मित्र सचिन गुंजाळ (रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर), सादीक भिकन शेख (रा. भामाठाण ता. श्रीरामपूर), नीलेश (रा. वडाळा, ता. श्रीरामपूर, पूर्ण नाव माहिती नाही, पप्पू होते.
ते शेताच्या बांधावर आले व उगलेंना म्हणाले की आम्हाला येथून वाळू वाहतूक करायची आहे. तुम्ही इथे शेती करू नका. त्यावर उगले त्यांना म्हणाले, की ही आमची वडीलोपार्जीत शेती आहे. इथे आम्ही पीक घेऊन आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्यावर तो म्हणाल, की तुम्ही इथे शेती करू नका. नाहीतर मी तुमच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर संदीप वाघमारे याने सचिन गुंजाळ यास त्याच्या स्कॉर्पीओ वाहनातून पक्षी मारण्याची गुलेर आणण्यास सांगून संदीप वाघमारे, सादीक शेख, नीलेश, पप्पू यांनी हातामध्ये गुलेर घेऊन त्यात दगडे टाकून उगले यांच्या दिशेने मारा केला. यामुळे उगले आणि त्यांचे काका जखमी झाले. आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून त्यांनी उगले यांचा मोबाइल व जवळील २५ हजार रुपये हिसकावून पसार झाले. विरगाव पोलिसांनी संदीपसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार विजय ब्रह्मांदे करत आहेत.