छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) शाखेला मुंबईत झालेल्या आयएमएच्या बैठकीत राज्य पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. आयएमए २०२३-२४ चे अध्यक्ष डॉ. यशवंत गाडे आणि सचिव डॉ. अनुपम टाकळकर यांना त्यांच्या कारकिर्दीतील प्रभावी कार्याबद्दल सर्वोत्कृष्ट अध्यक्ष आणि उत्कृष्ट सचिव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. गाडे आणि डॉ. टाकळकर यांनी ७५ हून अधिक लोकाभिमुख उपक्रम हाती घेतले. यात आरोग्य सेवा देण्यासाठी गावे दत्तक घेणे, त्या गावांत १९ आरोग्य शिबिरे त्यांनी घेतली. याशिवाय आयएमए हॉलमध्ये मोफत ओपीडी स्थापन करणे, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आत्महत्या प्रतिबंध कार्यशाळा, कर्करोग जागरूकता आणि व्यसनमुक्ती कार्यशाळा यासह महत्त्वाच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करणे हे उपक्रमही राबवले. महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणीची शिबिरे, प्रौढ लसीकरण मोहीम, मासिक पाळीच्या आरोग्याविषयी जागरुकता वाढवणे आणि पाच सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवणे यासारखे उपक्रम राबवून त्यांनी शाखेला लोकाभिमुख केले. रक्तदाब आणि इतर हृदयरोग जनजागृती, विविध कॅम्पस, प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन स्क्रीन डी ॲडिक्शन कॅम्प, व्यसनमुक्ती कार्यशाळा, मेनस्ट्रुअल अवेअरनेस कॅम्प आदी नवनवीन उपक्रम हाती घेतले होते.
आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिलकुमार नायक यांनी वैयक्तिकरित्या डॉ. यशवंत गाडे आणि डॉ. अनुपम टाकळकर यांचे त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन केले. या वेळी अभिनंदन करण्यासाठी राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कदम, दिनेश ठाकरे, डॉ. शरद अग्रवाल, डॉ. अशोक आढाव, डॉ. रवी वानखेडकर, डॉ. शिवकुमार उत्तुरे हे राज्य, राष्ट्रीय स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील डॉक्टर, शहरातील विविध नेते आणि छत्रपती संभाजीनगरातील हितचिंतकांनीही या सन्मानाबद्दल डॉ. गाडे आणि डॉ. टाकळकर यांचे अभिनंदन केले. पुरस्काराबद्दल डॉ. यशवंत गाडे आणि डॉ. अनुपम टाकळकर यांनी सर्व आयएमए सदस्यांचे आभार मानले. हे पुरस्कार व्यवस्थापकीय समिती, पदाधिकारी आणि सर्व आयएमए सदस्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे परिणाम आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. रुग्णांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांना त्यांनी हा पुरस्कार समर्पित केला.