वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : भोकरगाव (ता. वैजापूर) शिवारात शेतवस्तीवर राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून दोघांनी बेदम मारहाण करत महिलेच्या अंगावरील दागिने व घरातील रक्कम लुटून नेली. ही घटना रविवारी (१० नोव्हेंबर) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली.
याप्रकरणी विजू राजपूत (रा. झोलेगाव, ता. वैजापूर) व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिजाबाई एकनाथ नागे (वय ६५) या पतीसह राहतात. रविवारी रात्री त्यांच्या घरात विजू राजपूत व त्याचा साथीदार घुसले. त्यांनी जिजाबाई यांच्या हातावर चाकूने वार करून त्यांच्या पतीलाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. जिजाबाईंच्या कानातील दोन झुंबर व घरातील ७० हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला. जिजाबाई यांनी शिऊर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून विजू राजपूत व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बीट जमादार गणेश गोरक्ष करत आहेत.