छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्या सिल्लोड आणि पैठण मतदारसंघात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून दबावाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा आहे. यामुळे शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार अब्दुल सत्तार (सिल्लोड) आणि विलास भुमरे (पैठण) यांची चिंता वाढली आहे. जालना लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने युती धर्म निभावण्यात आला, त्याचप्रमाणे आता विधानभेत स्थानिक भाजप पदाधिकारी युती धर्म निभावत असल्याची चर्चा असून यातून आपले अस्तित्व दाखवून देण्याचाही प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे.
सिल्लोड मतदारसंघात संघ परिवारातील ज्येष्ठ सदस्य, भाजपचे निष्ठावंत सुरेश बनकर यांनी उबाठा शिवसेनेची मशाल पेटवली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या पराभवाला जबाबदार असलेल्या या दोन्ही मंत्र्यांना ‘चकवा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तार यांनी नुकतेच केलेल्या ‘कल्याण’कारी विधानामुळे दानवे यांच्या पराभवाची जखम ताजी झाली. आता ते सत्तार यांना दिवाळीनिमित्त काय भेट देतात, यावर सिल्लोडची ‘सत्ता’ कुणाच्या हाती हे ठरेल.
पैठण विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भुमरे यांचे एक कट्टर समर्थक, सरपंच पती उत्साहात दररोज स्टेटस ठेवत होते. वरचे काहीही होवो, भुमरे यांना दिल्लीत पाठवा, अशा आशयाचे ते स्टेटस आता भाजपला सलत आहे. आता त्या स्टेट्सचे उत्तर देण्याची संधी भाजपाकडे आली आहे. त्यांनी ती साधली तर कोट्यवधींचा विकास हा मुद्दा कितपत चालेल, याची शंकाच आहे. पहिल्या कामाख्या दर्शन सोहळ्यापासून भुमरे व सत्तार यांची प्रतिमा, प्रभाव सतत वाढत आहे. शेवटच्या टप्प्यात सिडकोचे अध्यक्षपद लाभलेले संजय शिरसाट यांनाही आजवर या मंत्र्यांनी दुय्यम स्थान दिले आहे. आता त्यांनी आपले स्थान महात्म्य दाखवले तर मंत्रीद्वय अधिकच जेरीस येऊ शकतात.
मुंबई, गुजरातची यंत्रणा सक्रिय
या वेळी प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारात उतरला आहे. पैठण व सिल्लोड मतदारसंघात संघ, गुजरात राज्यातील ज्येष्ठ नेते अमित शहा व शिंदे सेना यांच्या जिल्ह्याबाहेरील टीम सक्रिय झाल्या आहेत. उमेदवार व इतर कोणत्याही राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांना टीमबाबत फारशी माहिती नाही. नियमितपणे संघ व अमित भाईंकडे अहवाल सादर होत आहेत.