मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दहा दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांचा बाबा सिद्दीकी केला जाईल, अशा धमकीचा मेसेज मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. फातिमा खान असे या तरुणीचे नाव असून, ती ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर भागात कुटुंबासह राहते.
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला वांद्रे पूर्व येथे तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळी असल्याचे समोर आले. या प्रकरणात आजवर पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे. अजूनही तपास सुरू आहे. अशातच थेट योगींना जीवे मारण्याची धमकी आल्याने यंत्रणा अलर्ट झाली. याआधी मार्चमध्येही लखनौतील महानगर पोलिसांच्या नियंत्रण कक्षात योगी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता तरुणीने मेसेज करून बाबा सिद्दीकी करण्याची धमकी दिली. मुंबई पोलिसांनी तिला अटक केल्याची माहिती अधिकारीक सूत्रांनी दिली.