छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकातील हॉटेल वेलकममध्ये कामगारानेच मोठी चोरी करून पसार झाला आहे. त्याने गल्ल्यातून १ लाख १७ हजार रुपये चोरून नेले आहेत. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश चंद्रसिंग पंडारे असे या कामगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध हॉटेलमालक अतुल चक (रा. श्रमसाफल्य हौसिंग सोसायटी, बजाजनगर) यांनी तक्रार दिली. ते १० वर्षांपासून हॉटेल वेलकम चालवतात. त्यांच्याकडे रिषभकुमार, सलीलकुमार, मोहित कुमार आणि गणेश पंडारे असे ४ कामगार आहेत. ३० ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता चक हे घरी असताना कामगार सलीलकुमारचा कॉल आला, की गल्ल्यात ठेवलेले १ लाख १७ हजार रुपये दिसत नाहीत.
चक यांनी हॉटेलमध्ये येऊन पाहिले असता गणेश कुठेच दिसला नाही. सीसीटीव्ही फूटेज तपासले असता गणेशने हॉटेलचे काऊंटर उघडून त्यात ठेवलेले रोख १ लाख १७ हजार रुपये चोरून नेल्याचे दिसले. त्याचा फोनही बंद येत आहे. चक यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुरेश तारव करत आहेत.