संघर्षसारख्या चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसलेल्या चिमुरडीने चित्रपटात पदार्पण करून लवकरच स्वत:चे नाव कमावले आणि सर्वात यशस्वी आणि अष्टपैलू अभिनेत्रीचा दर्जा प्राप्त केला… आम्ही बोलत आहोत ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून करिअरची सुरुवात करणाऱ्या आलिया भट्टबद्दल. भट्ट कुटुंबाची लेक असलेली, कपूर कुटुंबाचा वारसा पुढे नेणारी सून आलिया प्रतिभावान व्यक्तिमत्व आहे. ती एक प्रेमळ पत्नी आणि आईदेखील आहे. आपल्या साधेपणामुळे, मेहनतीमुळे आणि सतत नाविन्यपूर्ण करण्याची इच्छा यामुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या आलियासोबत खास बातचीत…
प्रश्न : दिवाळी कशी साजरी केली?
आलिया : मी दिवाळीकडे मोठ्या सकारात्मकतेने पाहते. यानिमित्ताने कुटुंबीय, मित्र आणि प्रियजनांचा सहवास सणाचा आनंद वाढवतो. घराची साफसफाई केल्याने अधिक सकारात्मकता येते. मी अशा प्रसंगी खूप गोड खाते. सण आपल्या परंपरा आणि कुटुंब मजबूत करतात. आमच्या दिवाळी पार्ट्या सुरू झाल्या आहेत. मला खूप आनंद होत आहे की यावेळी दिवाळीत मी माझ्या मुलगी आणि कुटुंबासह घरी आहे. मी त्यांच्यासोबत वेळ घालवत आहे आणि माझे आवडते पदार्थ खात आहे.
प्रश्न : तुझ्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर तू अभिनेत्री व्हायचं कधी ठरवलंस?
आलिया : वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी मी हिरोईन व्हायचं ठरवलं होतं. मला आठवतंय त्या दिवशी मी गोविंदा आणि करिश्मा कपूरचा चित्रपट पाहत होते. ज्यात दोघेही रस्त्यावर गाणे म्हणत होते. त्यावेळी दोघेही नाचत होते आणि पटकन कपडे बदलत होते हे पाहून मला आश्चर्य वाटले. मला वाटले हे आश्चर्यकारक आहे, ते कपडे कसे आणि कुठून बदलत आहेत, मलाही तेच करायचे आहे. तिथूनच मला अभिनयाची बाधा झाली. संघर्षमध्येही मी छोटी भूमिका केली होती आणि त्यानंतर मला खात्री पटली की मला फक्त कॅमेऱ्यासमोर अभिनय करायचा आहे.
प्रश्न : तुमची बहीण आणि आई तुमची सपोर्ट सिस्टीम आहेत असे तुम्ही नेहमी म्हणता…
आलिया : हो कायमच! माझी आई माझी प्रेरणा आहे आणि शाहीन ही माझी सपोर्ट सिस्टीम आणि आनंदाचा किरण आहे. या दोघी माझ्या आयुष्यातील अतिशय सशक्त आणि विचारशील महिला आहेत. ज्यांच्याकडून मी दररोज काहीतरी शिकते. मी माझ्या बहिणीशी काहीही शेअर करू शकते. ती या इंडस्ट्रीची नाही आणि जेव्हाही ती माझ्या कामाबद्दल किंवा चित्रपटांबद्दल बोलते तेव्हा ती वस्तुनिष्ठपणे बोलते. तिचे विचार अतिशय शुद्ध आहेत. माझी आई माझे जग आहे आणि माझे वडील माझ्यासाठी जगाचा आरसा आहेत. माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम माझी धाकटी बहीण आणि माझे कुटुंब आहे.
प्रश्न : अभिनेत्री आई सोनी राजदान आणि दिग्दर्शक वडील महेश भट्ट यांचा तुझ्या आयुष्यावर किती प्रभाव पडला?
आलिया : माझ्या आयुष्यात माझी आई माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. अभिनय आणि जीवनाबद्दलची तिची आवड मला खूप प्रेरित करते. एक व्यक्ती म्हणून तिने मला नेहमीच मोठी ताकद दिली आहे. तिच्या योगदानाचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. माझे वडील माझ्यासाठी सतत प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी मला नेहमी सांगितले आहे की जर तुमच्यापेक्षा कोणी चांगले असेल तर लगेच निघून जाऊ नका. त्याच मेहनतीने तुमचे काम करा.
प्रश्न : भट्ट आणि कपूर घराण्याचा वारसा तू सुंदरपणे पुढे चालवत आहेस. पण तुला कधी दडपण येते का?
आलिया : मी दडपण म्हणू शकत नाही, पण या दोन्ही कुटुंबांचा एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. दोन्ही कुटुंबे अत्यंत प्रतिभावान, विचारवंत आहेत आणि माझ्या आयुष्यात हे लोक आल्याने मी धन्य आणि कृतज्ञ आहे.
प्रश्न : अभिनेता पती रणबीर कपूर तुझे कौतुक कसे करतो?
आलिया : रणबीर आणि मी खूप वेगळे आहोत. आम्ही दोघेही खूप वेगळा विचार करतो आणि गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळतो. तो अधिक शांत आहे, तर मी कधी कधी अतिविचार करते. पण मला असे वाटते की म्हणूनच आम्ही दोघेही समतोल राखतो आणि एकमेकांना पूरक आहोत. आम्ही एकमेकांची ताकद आणि कमकुवतपणा समजून घेतो आणि त्यामुळेच आमचे नाते मजबूत होते.
प्रश्न : राहाच्या जन्मानंतर मातृत्वाने तुमच्यात किती बदल झाला?
आलिया : राहाच्या जन्मानंतर मी स्वतःला पूर्णपणे नवीन व्यक्ती झाली आहे. मला स्वतःमध्ये फक्त चांगले बदल आढळले आहेत. मातृत्व ही केवळ एक भावना नसून प्रत्येक दिवस अनेक भावनांनी भरलेला असतो. हे आव्हानात्मकही आहे. मातृत्व ही एक प्रक्रिया आहे जिथे आपण दररोज आपल्याबद्दल बरेच काही शिकतो.
प्रश्न : करिअर आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधणारी अभिनेत्री म्हणून तू एक आदर्श आहेस, महिलांना काय संदेश द्यायला आवडेल?
आलिया : काम करत राहा, तुम्ही कधी कधी अपयशीसुद्धा व्हाल, पण तुमचा स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा. जितक्या जिद्दीने तुम्ही वावराल, तितकेच यश जवळ कराल.