छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरचे तत्कालिन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या कार्यावर आधारित “जनमाणसातील जिल्हाधिकारी, एक कर्मयोगी’ या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. यावेळी बोलताना सत्तार यांनी मोठे राजकीय गौप्यस्फोट केले. कोणाला दिल्लीला पाठवायचे (संदिपान भुमरे) अन् कोणाला घरी बसवायचं (रावसाहेब दानवे) हे मला माहिती आहे. ते (संदिपान भुमरे) दिल्लीला गेल्याशिवाय मी पालकमंत्री झालोच नसतो, असे वक्तव्य सत्तार यांनी करून खळबळ उडवून दिली.
मला छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री व्हायचे होते, तर मराठवाड्याचे सुपूत्र असलेले सुनील चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी व्हायचे होते. आम्हा दोघांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. स्वप्न पूर्ण करताना त्यांना जी. श्रीकांत यांचा अडथळा आला होता. मात्र, आम्ही तो दूर केला, असा गौप्यस्फोट त्यांनी करून अधिकाऱ्यांच्या बदल्यांतही मंत्र्यांच्या हस्तक्षेपाची थेट वाच्यताच केली.
सत्तार म्हणाले, सुनील चव्हाण आणि मी अनेक वर्षांपासून मित्र आहोत. ते जळगावला उपमुख्य कार्यकारी अधिकारी असल्यापासून ओळख होती. मी मंत्री असलो की खासगी सचिव सुनील चव्हाण असायचे. छत्रपती संभाजीनगरातील लेबर कॉलनीतील शासकीय निवासस्थानांची पाडापाडीची मोठी कारवाई चव्हाण यांनी केली. शासनस्तरावर त्या कार्याची दखल का घेतली नाही माहिती नाही. या जागेवर नूतन जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय संकुल उभारण्यात येणार आहे. त्यातील एका इमारतीला चव्हाण यांचे नाव देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रॉमिसही सत्तार यांनी यावेळी दिले.
चव्हाण यांनीही दिली कबुली…
सत्काराला उत्तर देताना सुनील चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांत मंत्र्यांच्या हस्तक्षेपाला एकप्रकारे दुजोराच दिला. ते म्हणाले, की मराठवाड्यात माझी २०१८ ला बदली झाली. सत्तार यांनी काहीतरी शब्द फिरवले अन् माझी बदली रद्द झाली. मात्र पुन्हा चारच महिन्यांत मी या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून आलो, असे ते म्हणाले.