छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी मिशन (एमजीएम) संस्थेच्या वतीने सामूहिक चरखा सूतकताई उपक्रम राबविण्यात आला. जेएनईसी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी एकाचवेळी २ हजार ५६५ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक चरखा सूतकताई करून विक्रम केला. उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी दिली.

उपक्रमाचे उद्घाटन इंदौर येथील आयआयटीतील प्रा. डॉ. कीर्ती त्रिवेदी, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांच्या उपस्थितीत झाले. उपक्रमात सूतकताईसाठी आठ समूहांमध्ये प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. अर्धा तास सूतकताई करण्यात आली. नाट्यशास्त्र विभागाच्या राहुल खरे यांच्या संघाने विविध भजने व गीतांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राजू सोनवणे यांनी केले.
