छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन सिल्लोडमध्ये ७ ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे. राज्यातील १० जिल्ह्यांतील ४०० कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी होणार असून १० ऑक्टोबरपर्यंत स्पर्धा चालणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील कुस्तीप्रेमी क्रीडा रसिकांसाठी पर्वणीच लाभणार आहे.
स्पर्धेच्या आयोजन समितीची बैठक आज, २ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, महाराष्ट्र कुस्ती संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत माहिती देण्यात आली की, स्पर्धा सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ४ ते रात्री ९ या कालावधीत होईल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाही संघ सहभागी होणार आहे.
सर्व खेळाडू व पंच, प्रशिक्षक मिळून ४०० जण या स्पर्धेसाठी येणार आहेत. फ्री स्टाईल व ग्रीको रोमन पद्धतीने या कुस्ती स्पर्धा ‘मॅट’ वर खेळवल्या जातील. स्पर्धेत महिला व पुरुष खेळाडूंचे संघ सहभागी होतील. पुरुषांसाठी वजन गट ५७ ते १२५ किलो तर महिलांसाठी ५७ ते ७७ किलो अशा वजनगटात स्पर्धा होतील. स्पर्धेचे आयोजन हे सिल्लोड येथील सहकारी सुतगिरणीच्या रिकाम्या जागेत करण्यात येत आहे.
तेथे ५० फूट बाय १५० फूट आकाराचे स्टेज करण्यात येणार असून त्यावर १२ मिटर बाय १२ मिटर आकाराच्या तीन मॅट लावण्यात येतील. त्यावर स्पर्धा होणार आहेत. स्पर्धा पाहता याव्या यासाठी १ हजार प्रेक्षक बसू शकतील अशी प्रेक्षक गॅलरीही तयार करण्यात येणार आहे. स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे अल्पसंख्याक, औकाफ व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ७ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता होणार आहे. विजेत्या खेळाडूंना विविध बक्षिसे दिले जाणार आहेत. त्यात ७५ हजर अते २५ हजार पर्यंतची बक्षिसे आहेत. शिवाय इतर गटातील विजेत्यांना ४० हजार ते २० हजार पर्यंतची बक्षिसे आहेत.