छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आमच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा ३ ऑक्टोबरपर्यंत मागे घे अन्यथा तुझ्या कुटुंबाला ठार मारून टाकू, अशी धमकी मुलीच्या सासरच्यांनी दिल्याने घाबरून ५५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चौका (ता. छत्रपती संभाजीनगर) शिवारात मंगळवारी (१ ऑक्टोबर) दुपारी साडेबाराला समोर आली.
मोहन बाबूराव जाधव (वय ५५, रा. राधास्वामी कॉलनी, हर्सूल) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दीड वर्षापूर्वी मोहन जाधव यांच्या मुलीचे लग्न पाडेगाव येथील अंकुश संजय विसपुते याच्यासोबत झाले. मात्र सासरच्या लोकांकडून तिचा छळ केला जात होता. त्यामुळे जाधव यांनी मुलीला माहेरी हर्सूलला आणले. घरगुती छळाची तक्रार त्यांच्या मुलीने हर्सूल पोलीस ठाण्यात केली होती. त्यावरून हर्सूल पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
तो गुन्हा मागे घेण्यासाठी मुलीच्या सासरकडील लोक दबाव आणत होते. त्यासाठी त्यांनी जाधव यांना ३ ऑक्टोबरची मुदत देत, जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे जाधव घाबरून गेले होते. त्यामुळे चौका शिवारात येऊन जाधव यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हॉट्स अॅप ग्रुपवर सुसाइड नोट व्हायरल केली. सुसाइड नोट वाचून ग्रुपमधील सदस्यांनी जाधव यांचा शोध सुरू केला तेव्हा चौका शिवारात त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जाधव यांना फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जाधव यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी फुलंब्री पोलिसांनी जावई अंकुश संजय विसपुतेसह संजय शेनफड विसपुते, मीना संजय विसपुते, विश्वनाथ रामभाऊ सोनगिरे या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.