कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड) येथील शेतकऱ्याने नापिकी, कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेला कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास समोर आली.
विलास दादा पवार (वय ४१, रा. चिंचोली लिंबाजी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या आई – वडिलांच्या नावावर सात एकर कोरडवाहू शेती आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे खरीप पिके वाया गेली. यंदाही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे बँक व खासगी व्यक्तींकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, याची चिंता त्यांना होती. यातूनच त्यांनी शेतातील विहिरीत आत्महत्या केली.
रात्रभर शोधले, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला…
विलास पवार सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी गोठ्यातील जनावरे गावाच्या गायरान जमिनीत चारायला घेऊन गेले. सायंकाळी जनावरे गोठ्यात बांधली. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र मिळून आले नाहीत. मंगळवारी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली. काही जणांनी गट नं. ३९० मधील विहिरीत डोकावून बघितले असता मृतदेह आढळला. गळ टाकून मृतदेह बाहेर काढण्यात आला.