छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्याबद्दल पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या असून, त्यांना बदलण्याची मागणी समोर येत आहे. अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांना याबाबत निवेदनही देण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या मागणीच्या निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हे, कन्नड तालुकाध्यक्ष प्रकाश गाडेकर, गंगापूर तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे, पैठण तालुकाध्यक्ष विजय चव्हाण, कार्याध्यक्ष प्रकाश दिलवाले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंकज ठोंबरे, कन्नडचे नगराध्यक्ष संतोष कोल्हे, महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्षा वैशाली साबळे, वैजापूर तालुका शहराध्यक्ष पुंडलिक गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सुरेश बनसोड, जिल्हा परिषद माजी सदस्य दत्तू पाटील, गंगापूर विधानसभा अध्यक्ष अशोक गायकवाड, वैजापूर तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, ओबीसी जिल्हाध्यक्ष रमेश निचित यांच्या सह्या असल्याचे वृत्त आजच्या अंकात एका आघाडीच्या दैनिकाने दिले आहे.
कैलास पाटील यांच्यावर पदाधिकारी का नाराज?
-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना कमकुवत झाल्याचा दावा.
-कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना कुठेच वाढली नाही. उलट त्यांच्या निष्क्रियतेमुळे ९० टक्के पदाधिकारी, नेते शरद पवार यांच्याकडेच थांबले.
-कैलास पाटील हे पक्षाने दिलेले कार्यक्रम राबवण्यात पुढाकार घेत नाही.
-पक्षासाठी त्यांनी कधीही मेळावे, आंदोलन, मोर्चे काढलेले नाहीत.
-पक्षाची जिल्हास्तरीय बैठकही ते कधी घेत नाहीत.