कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : नवरात्रोत्सवासाठी पायी ज्योत आणायला देशातील विविध ठिकाणी दरवर्षी पिशोरचे तरुण जात असतात. मध्य प्रदेशातील शारदा देवी येथून पायी ज्योत आणत असताना कारच्या धडकेत योगेश चंद्रभान डहाके (वय ४०, रा. पिशोर) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (१ ऑक्टोबर) पहाटे पावणेपाचच्या सुमारास घडली.
या अपघातात संतोष जगन सोनवणे (वय ३२, रा. पिशोर) जखमी झाले आहेत. ज्योतीसाठी तेल वाहून नेण्यासाठी तरुणांनी सोबत दुचाकी नेली होती. याच दुचाकीला मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्याच्या सुकरी गावाजवळ मागून भरधाव स्कॉर्पिओ कारने धडक दिली. यात योगेश व संतोष यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी संतोषवर मध्यप्रदेशातीलच सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योगेशच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.