छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उद्या, ३ ऑक्टोबरपासून शहरातील कर्णपुरा यात्रेची सुरुवात होत आहे. ही यात्रा शांतता व सुरक्षित वातावारणात पार पाडण्यासाठी प्रशासनाची तयारी झाली असून, स्वच्छता, सुरक्षितता व आरोग्यपूर्ण वातावरणात यात्रेचा आनंद घ्यावा. जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना दिली आहे.
यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. छावणीचे परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकांक्षा तिवारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे मारोती म्हस्के, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शैलजा मापारी, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आकांक्षा तिवारी यांनी सांगितले, की कर्णपुरा यात्रेत स्वच्छतेविषयी काळजी घेण्यात येणार असून, नागरिकांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी प्रशासनाने रस्ताही तयार केला आहे. महावीर चौकातील उड्डाणपुलाखाली गाड्यांसाठी पार्किंगसाठी जागा, मंदिरापर्यंत जाण्या- येण्याची वेगळी व्यवस्था केली आहे. पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत. यात्रेतील स्टॉलधारकांकडून ५ रुपये, १० रुपयांचा फॉर्म भरून घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कर्णपुरा यात्रा महोत्सवात पोलीस बंदोबस्त कडक असणार आहे. अग्निशामक दल, गणपती मंदिराजवळ आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम व एक रुग्णावाहिका सकाळी ८ ते सायंकाळी १० पर्यंत उपलब्ध असेल. आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी स्टॉलवाल्यांचे नियोजन केले आहे.
खाद्यपदार्थ तपासणार, प्लास्टिक पिशवीला बंदी…
यात्रेत स्टॉलवरील खाद्यपदार्थांची नियमित तपासणी होणार असून, प्लाास्टिक पिशवी बंदी असणार आहे. आकाश पाळणा, मौत का कुआँ यांची तपासणी होणार आहे. यात्रा महोत्सवात अव्याहतपणे विद्युतपुरवठा राहणार आहे. यात्रा सुरक्षित व शांततापूर्ण वातावरणात व्हावी, यासाठी सर्व संबंधित विभागाने योग्य समन्वय ठेवून खबरदारी घ्यावी, असे निर्देश श्री. स्वामी यांनी दिले.