छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बुद्धलेणीच्या पायथ्याचे विपश्यना केंद्र आणि विहार हे विद्यापीठाच्या जागेच्या बाहेर असूनही अतिक्रमण समजून नोटीस बजावण्यात आल्याने याच्या पाठीशी कोण आहे, याचा शोध घ्यावा, या स्थळाचा बौद्ध सर्किटमध्ये समावेश करून शासनाने तेथे पुरेशा सोयी-सुविधा द्याव्यात, या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर धम्मभूमी के सम्मान मे, हम सब मैदान में हा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
या वेळी प्रकाश निकाळजे, गौतम खरात, गौतग लांडगे, ॲड. रमेशभाई खंडागळे, संजय जगताप, दीपक निकाळजे, अरुण बोर्डे यांनी सांगितले की, बुद्धलेणीच्या पायथ्याशी ५५ ते ६० वर्षांपासून बुद्धविहार आणि विपश्यना केंद्र आहे. देश-विदेशातील बौद्ध अनुयायी, अभ्यासक भेट देतात. वनविभाग आणि पुरातत्व विभागाच्या जागेवर हे स्थान असून, विद्यापीठाचा जागेशी कसलाही संबंध नाही. तरीही बेगमपुरा पोलिसांनी अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस दिली.
यामागील सूत्रधाराचा शोध घेण्यात यावा. याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५० एकर जागा द्यावी, बुद्धलेणी व परिसराला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे यासह अन्य मागण्या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला भदन्त नागसेनबोधी महाथेरो, भन्ते संघप्रिय, भन्ते बोधीधम्म, भन्ते उपाली, भन्ते निर्वाण, भन्ते आनंद यांनी भिक्खू संघाच्या वतीने भूमिका मांडली. दौलत खरात, जालिंदर शेंडगे, किशोर थोरात, सचिन निकम, बंडू कांबळे, विजय वाहुळ, आनंद कस्तुरे, अमित वाहूळ आदींसह आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.