पाचोड (सीएससीएन वृत्तसेवा) : नांदर (ता. पैठण) येथील २० वर्षीय सानिया साहिल पठाण या गर्भवतीचा मृतदेह मंगळवारी (१ ऑक्टोबर) दुपारी चारच्या सुमारास घरातच आढळल्याने खळबळ उडाली आहे. पलंगावर सानिया निपचित पडलेली होती. शवविच्छेदन अहवालानंतर सानियाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
सानिया ही पती साहिल, सासू, सासरे यांच्यासह राहत होती. साहिलचे हॉटेल आहे. सासू-सासरे बाहेरगावी तर पती हॉटेलमध्ये गेल्याने सानिया घरी एकटीच होती. साहिल जेवण करण्यासाठी घरी आला असता दरवाजा आतून लावलेला होता. आवाज दिल्यानंतरही दरवाजा उघडला नसल्याने साहिलने दरवाजा तोडला. पलंगावर सानिया निपचित पडलेली दिसली. त्याने आरडाओरडा केला असता शेजारी जमा झाले.
सानियाला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ती तीन महिन्यांची गर्भवती होती. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली. अकस्मात मृत्यूची नोंद करून पाचोड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.