पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : सहा महिन्यांच्या बाळासह महिला डॉक्टरने गोदावरी नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१ ऑक्टोबर) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पैठण तालुक्यातील पाटेगाव शिवारात घडली. चांगतपुरीस जायचे असल्याचे सांगून त्या शहरातून ऑटोरिक्षात बसलल्या होत्या, पाटेगाव पूल आल्यानंतर पाणी पहायचे म्हणून रिक्षा थांबवली अन् पुलावरून उडी घेतली. दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर त्यांचा मृतदेह मिळून आला आहे. बाळाचा मात्र शोध लागला नाही.
डॉ. पूजा प्रभाकर व्हरकटे (वय ३०, रा. पैठण) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे नाव असून, त्या बीएएमएस आहेत. चांगतपुरी येथील डॉ. प्रभाकर व्हरकटे यांचा जुन्या तहसील परिसरात दवाखाना आहे. ते पैठण शहरात पत्नी डॉ. पूजा, ६ वर्षांचा मुलगा व ६ महिन्यांच्या बाळासह राहतात. मंगळवारी सायंकाळी डॉ. पूजा ६ महिन्यांच्या बाळाला घेऊन घरातून निघाल्या होत्या. रिक्षा स्टॅण्डवर येऊन रिक्षा करून त्या चांगतपुरीला जायचे म्हणून बसल्या. पाटेगाव पुलावर आल्यानंतर त्यांनी गोदावरी नदीतील पाणी पहायचे म्हणून रिक्षा थांबवली.
रिक्षातून उतरून काही क्षणांतच ६ महिन्यांच्या बाळासह नदीत उडी घेतली. ते पाहून घाबरून गेलेल्या रिक्षाचालकाने आरडाओरड केली. त्यानंतर नागरिक जमा झाले. पोलिसांना कळवताच ते घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे यांच्या मदतीने स्थानिक १५ ते २० मच्छीमारांना घेऊन गोदावरी पात्रात तब्बल दोन तास रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. पूजा यांचा मृतदेह मिळून आला. मात्र बाळाचा शोध लागला नाही. पूजा यांचा मृतदेह शहरातील शासकीय रुग्णालय नेण्यात आला. डॉ. पूजा यांनी आत्महत्या का केली हे समोर आलेले नाही.