छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : “मी पैसे कमवायला जात आहे. कोणाच्या दबावाखाली, कोणालाही त्रासून जात नाही आहे. मला अभ्यासामध्ये रुची नाही…” अशी चिठ्ठी लिहून १६ वर्षीय मुलगा घर सोडून गेला आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेत मुलाचा शोध सुरू केला आहे.
अपहरण झालेला मुलगा गारखेडा परिसरात राहतो. तो अकरावीत शिकतो. त्याचे वडील खासगी कंपनीत काम करतात. साेमवारी (३० सप्टेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलगा नेहमीप्रमाणे जवाहर कॉलनीत क्लास जातो, असे आजोबाला सांगून गेला. दुपारी चारपर्यंत तो परतला नाही. त्यामुळे मुलाच्या आईने क्लासमधील टिचरला कॉल केला असता त्यांनी तुमचा मुलगा क्लासला आलाच नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुलाची आई घाबरून गेली.
त्यांनी पतीला सांगितल्यानंतर दोघांनी मिळून मुलाचा शोध सुरू केला. त्याच्या मित्रांना विचारपूस केली. परंतु तो त्यांच्याकडे आला नसल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळी सातला घरी परत येऊन त्यांनी कपाट शोधले असता मुलाने त्याच्या हस्ताक्षरात लाल पेनाने लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळून आली. चिठ्ठी वाचून हादरलेल्या पालकांनी तातडीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मुलाचे कुणीतरी अपहरण केल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे करत आहेत.