छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : “मम्मी माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. म्हणून मी यानंतर तुम्हाला कधीच तोंड दाखवणार नाही आणि मला शोधूपण नका. मम्मी-पप्पा झाल तर माफ करा. मी लग्नपण केलं आहे…” अशी चिठ्ठी लिहून १७ वर्षीय मुलीने साडी नेसली, बॅग भरली अन् घर सोडले…चिठ्ठी वाचल्यानंतर हादरलेल्या महिलेने मुलीच्या अपहरणाची तक्रार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदवली असून, मुलीच्या २१ वर्षीय प्रियकराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेने या प्रकरणात तक्रार दिली. तक्रारीनुसार, त्यांची अपहरण झालेली मुलगी १२ वीत छत्रपती कॉलेजमध्ये शिकते. त्या नेहमीप्रमाणे सोमवारी (३० सप्टेंबर) कामावर गेल्या असता सकाळी साडेनऊला शेजारील महिलेने त्यांना कॉल करून सांगितले, की तुमची मुलगी साडी घालून हातात बॅग घेऊन गेली आहे. ते ऐकल्यावर घाबरून गेलेल्या महिलेने तातडीने घर गाठले. त्यावेळी मुलगी घरी नसल्याने तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.
घरी येऊन तिची कागदपत्रे शोधली असता शैक्षणिक सर्व कागदपत्रे गायब होती. मुलीने तिच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली छोटी चिठ्ठी दिसून आली. ती चिठ्ठी वाचून महिला हादरून गेली. यापूर्वीही त्यांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात केली होती. ती घटना २४ जानेवारी २०२४ ची आहे. त्यावेळी पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला करण चंद्रकांत तुरुकमाने (वय २१, रा. बालाजीनगर) याच्यासोबत पकडले होते. त्याच्याविरुद्ध त्यावेळी अपहरण, बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला होता. त्यामुळे मुलीच्या आईने पुन्हा करणवरच संशय व्यक्त केला आहे. त्यावरून पोलिसांनी करणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे करत आहेत.