छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : काँग्रेस शहर उपाध्यक्ष तथा उद्योजक युसूफ मुकाती यांच्यावर तीन ते चार जणांनी जीवघेणा हल्ला चढवला. मुकाती यांच्यावर चाकूचे वार करण्यात आले. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सिडकोतील वैद्यनाथ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेत मुकाती यांचा भाचाही हल्लेखोरांच्या मारहाणीत जखमी झाला आहे. सोमवारी (३० सप्टेंबर) दुपारी अडीचला पैठण गेटजवळ ही थरारक घटना घडली.
पैठण गेट भागात मुकाती यांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. त्याच ठिकाणी त्यांचे पक्ष कार्यालयही आहे. कॉम्प्लेक्सच्या शेजारी जिन्स जंक्शन हे कपड्याचे दुकान आहे. या दुकानमालकासोबत मुकाती यांचा भिंतीवरून काही दिवसांपासून वाद सुरू आहे. सोमवारी दुपारी मुकाती व त्यांचा भाचा अहेमद कार्यालयात असताना दुकानदासोबत पुन्हा वाद झाला. त्यानंतर तीन ते चार जण आले. त्यांनी मुकाती आणि त्यांच्या भाचावर हल्ला चढवला.
भाचाच्या डोक्यात फरशी घातल्यानंतर टोळक्यातील एकाने चाकू काढून मुकाती यांना भोसकायला सुरुवात केली. छाती, पोट, हात, पाठीवर चाकूचे वार केले. त्यानंतर मुकाती यांना ओढून रस्त्यावर आणले. लोक धावून आल्याने हल्लेखोर पळून गेले. रिक्षातून दोघा जखमींना वैद्यनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. क्रांती चौक पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते जबाब देण्याच्या स्थितीत नाहीत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.