कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : दुचाकीने शेतातून घरी येताना शेतकऱ्याच्या समोर अचानक दोन बिबटे आले. त्यातील एकाने त्यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान राखत शेतकऱ्याने दुचाकीचा वेग वाढवून सुसाट घराकडे धूम ठोकली. बिबट्याने काही अंतरापर्यंत पाठलाग केला. ही थरारक घटना कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरात हतनूर-तिसगाव रस्त्यावर सोमवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी घडली.
चांगदेव कुकलारे (रा. हतनूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेमुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुकलारे दुचाकीने हतनूर-तिसगाव रस्त्याने घरी येत असताना त्यांना लांबूनच डाव्या बाजूला लालसर काहीतरी दिसले. त्यांना वाटले कुत्रा असेल. मात्र जवळ आल्यावर तो बिबट्या असल्याचे पाहून कुकलारेंची भीतीने गाळण उडाली. उजव्या बाजूलाही आणखी एक दुसरा बिबट्या होता. त्यामुळे कुकलारे घाबरून गेले.
मात्र संयम न हरवता त्यांनी दुचाकीचा वेग वाढवला आणि तिथून निसटण्याचा प्रयत्न केला. उजव्या बाजूच्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. सुदैवाने गाडी पुढे गेल्याने त्याचा निशाणा चुकला. कुकलारे यांच्या पायाला पंजा लागला. बिबट्याने त्यांचा सुमारे ४० फुटांपर्यंत पाठलाग केला. कुकलारे यांनी गावात आल्यावर घडलेला प्रकार सांगितला. ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहिणी साळुंखे यांना कळवल्यानंतर रात्री नऊला वनपाल अशोक आव्हाड, वनमजूर कैलास जाधव यांच्यासह वनविभागाचे पथक घटनास्थळी आले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे.