छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी गावावर सोमवारी (३० सप्टेंबर) सकाळी एक विमान घिरट्या घालत असल्याने ग्रामस्थांचे कुतूहल जागे झाले. विमानाला झालंय काय, अशी चर्चा रंगली… दिवसभर याचा खुलासा झाला नाही, आम्ही करत आहोत खुलासा. झालं काय, की सकाळच्या वेळेतील इंडिगोचे मुंबईला जाणारे विमान उड्डाण करण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी एअर इंडियाचे दिल्लीहून आलेले विमानही छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले. इंडिगोचे विमान उड्डाण करेपर्यंत एअर इंडियाच्या विमानाने लाडसावंगीकरांची करमणूक केली… असे अनेकदा घडते, उतरायला संधी नसेल तर विमानाला आकाशात घिरट्या घालाव्या लागतात…
सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान हा प्रकार घडला. एकाच विमानाने लाडसावंगी गावावर आठ ते दहा घिरट्या घातल्याने गावकरी चकीत झाले. रोज सकाळी, दुपारी व सायंकाळी या तीन वेळांत चिकलठाणा विमानतळावर उतरणारे विमान लाडसावंगी गावावरून जाते. सोमवारी सकाळी ते लाडसावंगी परिसरात गोल-गोल फिरू लागल्याने ग्रामस्थांत चर्चेत डुंबले. जिल्ह्यात सध्या रात्री-अपरात्री ड्रोन फिरत असल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे, त्यात विमानही घिरट्या घालू लागल्याने गावकरी हैराण झाले होते.