छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नियंत्रण सुटलेल्या कार वारंवार छत्रपतीनगरवासियांच्या जिवावर बेतत आहेत. आकाशवाणी चौक, निरालाबाजार, ठाकरेनगरनंतर आता बाबा पेट्रोलपंप चौक ते ए. एस. क्लबदरम्यान अशीच घटना घडली. भरधाव स्कॉर्पिओ चालकाने अनेक वाहनांना हूल दिल्यानंतर दोन दुचाकी व एका कारला उडवले. यात दोघे जखमी झाले. त्यानंतरही स्कॉर्पिओचालक थांबला नाही. वाळूजच्या दिशेने सुसाट गेला. सोमवारी (३० सप्टेंबर) दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान हा अपघात घडला. हिट ॲण्ड रनच्या वाढत्या घटनांनी शहरात चिंतेची जागा आता दहशतीने घेतली आहे.
अब्दुल बासिद अब्दुल गणी (वय ३३, रा. शहागंज) बाबा पेट्रोलपंप चौकातून मोपेडने (क्र. एमएच २० एफएच ९५४९) पडेगावला जात असताना होलिक्रॉस शाळेसमोर मागून आलेल्या पांढऱ्या स्कॉर्पिओने त्यांना उडवले. गणी दूरवर फेकले जाऊन जखमी झाले. पुढे स्कॉर्पिओने कारसह (क्र. एमएच २० एमडब्ल्यू १४०३) आणखी एका दुचाकीस्वार व चारचाकीला धडक दिली. नंतर स्कॉर्पिओ वाळूजच्या दिशेने रस्त्यावरील प्रत्येक वाहनचालकाला हूल देत सुसाट गेली. दुचाकीवरील दाम्पत्यापैकी वडील व लहान मुलाच्या छाती व तोंडाला मार लागला. गणी यांनी छावणी पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार दिली आहे. मात्र त्यांना स्कॉर्पिओचा नंबर सांगता आला नाही. पोलीस आता स्कॉर्पिओचा शोध घेत आहेत.