छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नेल आर्ट डिझाइन करणाऱ्याशी झालेली मैत्री आणि त्यातून एकमेकांचे मोबाइलवर बोलणे… २२ वर्षीय विवाहित तरुणीला चांगलेच महागात पडले. तो तिच्या प्रेमात पडला अन् तिच्या मागेच लागला. यातून तिला भेटण्यासाठी हट्ट सुरू केला. तिने नकार देताच, शिवीगाळ केली. तिने त्याचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला तरी तो दुसऱ्या क्रमांकावर कॉल करून तिला भेटायला सांगू लागला. अखेर तरुणीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार विवाहित तरुणी बजाजनगरात राहते. शेजारील महिला आणि तिच्या पतीसोबत मेमध्ये शहरातील एका मॉलमध्ये गेली होती. त्यावेळी निशु नेल आर्ट या दुकानात तिने शुभम रोकडे याच्याकडून नेल डिझाईन करून घेतली होती. शुभमने १४ जुलैला तिच्या मोबाइलवर कॉल करून मी तुझी मोफत नेल डिझाइन करून देत जाईन. तू माझ्या दुकानात नेहमी येत जा, असे सांगितले. त्याला तरुणीने नकार दिला. तरीही शुभम सतत तिच्या मोबाइलवर कॉल करून तू माझ्यासोबत बोलत जा म्हणून तिच्याकडे हट्ट धरू लागला.
१७ सप्टेंबरला रात्री सव्वानऊला त्याने तिच्या मोबाइलवर कॉल करून तू घराखाली ये, मी तुझ्या घरासमोरील रोडवर उभा आहे, असे सांगितल्याने तरुणी घाबरून गेली. तिने त्याला भेटण्यास नकार दिला. त्यामुळे शुभमने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर तिने त्याचा मोबाइल क्रमांक ब्लॉकमध्ये टाकला. शुभमने मग दुसऱ्या क्रमांकावरून रविवारी (२९ सप्टेंबर) रात्री नऊच्या सुमारास तिला कॉल करून भेटायचा हट्ट केला. तरुणीने तिच्या भावाला फोन दिला असता शुभमने त्यालाही शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार केशव चौथे करत आहेत.