सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : सिल्लोडमध्ये हिंदूंवर अत्याचार वाढल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने सोमवारी (३० सप्टेंबर) दुपारी एकला सिल्लोड शहरातून जनआक्रोश मोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने हजारो नागरिक सहभागी झाले होते. १९ सप्टेंबरला मंत्री अब्दुल सत्तार समर्थकांनी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्याला हे सकल हिंदू समाजाने प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, सत्तार समर्थकांच्या मोर्चात जेवढे लोक होते, त्यादुप्पट या मोर्चात लोक सहभागी झाल्याचे पहायला मिळाल्याने सत्तार-दानवे संघर्षात पुढे काय काय पहायला मिळेल, अशी चर्चा सुरू आहे.
शिवना येथील बाजारपेठेत गणेश महासंघातर्फे आयोजित कार्यक्रमात लावण्या लावून बाया नाचवता का, असा आरोप करत भाजप नेते अरुण काळे यांच्यासह ३८ जणांनी कार्यक्रम बंद पाडला होता. यावेळी झालेल्या गोंधळप्रकरणी ३९ जणांविरुद्ध अजिंठा पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घेण्यासह अन्य मागण्या मोर्चातून करण्यात आल्या. मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरुवात झाली. प्रियदर्शनी चौक मार्गे मोर्चा सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आला. तेथे मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. या वेळी विविध मान्यवरांनी भाषणे केली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार शेख हारुण यांना देण्यात आले.
या वेळी माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इंद्रिस मुलतानी, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, राजेंद्र जैस्वाल, तालुकाध्यक्ष अशोक गरुड, शहराध्यक्ष कमलेश कटारिया, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, विनोद मंडलेचा, अतुल कटारिया, ॲड. अशोक तायडे, अनिल खरात, विजय वानखेडे, राजेंद्र दांडगे, अंबादास सपकाळ, मनोज पंडित, द्वारकादास पंडित, मनोज मोरेल्लू, दिलीप दानेकर आदींची उपस्थिती होती. या वेळी भाजपचे सिल्लोड विधानसभा निवडणूकप्रमुख सुरेश बनकर यांनी मंत्री सत्तार यांच्यावर शरसंधान साधले. ते म्हणाले, की या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर १९ सप्टेंबर रोजी काढलेल्या मोर्चात बिनबुडाचे आरोप केले होते. दानवे यांनी सिल्लोड हा पाकिस्तान होतोय की काय, असे म्हटले होते. त्यावरून आरोप केले. सिल्लोड हे पाकिस्तान नाही तर मग काय बांगलादेश होत आहे का, असा सवाल त्यांनी केला.