छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या २६ वर्षीय प्रसिद्ध हिंदुत्ववादी महिला नेत्याला काही विकृतांकडून जीवे मारण्याच्या धमक्यांसह अश्लील शिवीगाळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात रविवारी (२९ सप्टेंबर) वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी १३ व्हॉट्स ॲप आणि इन्स्टाग्राम आयडीधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
तक्रारीत हिंदुत्ववादी महिला नेत्याने म्हटले आहे, की त्या वाळूज एमआयडीसी परिसरात राहतात. वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी शिर्डीला एका हॉटेलमध्ये राहत आहेत. एक वर्षापूर्वी नांदेडला जात असतानाही त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळी त्या हल्ल्यात जखमी झाल्या होत्या. ६ जुलैला त्यांनी त्यांच्या इन्स्टा खात्यावरून किल्ले विशाळगड येथील अतिक्रमणाबद्दलचा व्हिडीओ टाकला होता.
तेव्हापासून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. ३ हजार ते ४ हजार धमक्यांचे आणि घाणेरड्या शिवीगाळीचे मेसेज आले आहेत. सुरुवातीला त्यांनी अनेकांना ब्लॉक केले. मात्र वारंवार ठरवून एकाच पद्धतीचे मेसेज येत असल्याने ठरवून हा प्रकार केला जात असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे मला व माझ्या कुटुंबीयांना जगणे अवघड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे यांनी स्वतः या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, धमक्या आणि शिवीगाळ करणाऱ्यांचा सायबर पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर तपास केला जात आहे.