छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लेकीच्या घटस्फोटीत पतीला (माजी जावई) जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी माजीनगरसेवकासह तिघांविरुद्ध छावणी पोलिसांनी आज, ३० सप्टेंबरला सकाळी गुन्हा दाखल केला आहे. ही थरारक घटना रविवारी (२९ सप्टेंबर) रात्री पावणेबाराच्या सुमारास मिटमिटा शिवारातील तिसगाव बायपास रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडली.
उमर खान इलियास अहमद खान (वय २४, रा. आरेफ कॉलनी पडेगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने छावणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तो सिव्हील इंजीनिअरच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेतो. सन २०२१ मध्ये त्याचे लग्न त्याचे मामा माजी नगरसेवक अबुलाला अली हश्मी (रा. आरेफ कॉलनी शाहीन बाग) यांच्या मुलीसोबत झाले होते. मात्र काही कारणास्तव चार महिन्यांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला आहे. उमरची मिटमिटा शिवारात साडेपाच एकर शेती असून त्यावर प्लॉटींग केलेली आहे.
प्लॉटींगमधून काही चोरटे मुरूम चोरी करून नेतात. त्यामुळे उमर अधूनमधून प्लाँटींगवर चक्कर मारत असतो. रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास तो प्लॉटींगवर चक्कर मारून घराकडे मोटारसायकलीने येत असताना मिटमिटा शिवारातील तिसगाव बायपास रेल्वे उड्डाणपुलाच्या अलीकडे अबुलाला हश्मी व सोबत दुसरे मामा अबुल हसन अली हश्मी (रा. शाहीन बाग, आरेफ कॉलनी) व मोहसीन अली हश्मी (रा. चैतन्यनगर पडेगाव) या तिघांनी अडवले. ते म्हणाले की, तुम्हारे आरेफ कॉलनी का घर हमारे नाम पे करके दो, नही तो हम तुम्हारे मम्मी-पप्पा को जिंदा नही छोडेंगे, अशी धमकी त्यांनी दिली.
उमर त्यांना समजावून सांगत असताना अबुलाल अली यांनी त्यांच्याकडील चाकू काढून उमरवर वार केला. तो उमरने चकवला असता उमरला मोहसीन व अबुल यांनी पकडून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. अबुलाला हश्मी यांनी एका कॅनमध्ये पेट्रोल आणले होते. ते उमरच्या अंगावर टाकले व जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या भाऊसाहेब ढेपले व गणेश निघोट हे उमरच्या मदतीला धावले. त्यामुळे अबुलाल व त्यांचे साथीदार पळून गेले, असे उमरने तक्रारीत म्हटले आहे. भाऊसाहेब ढेपले व गणेश निघोट यांनी उमरला घाटी रुग्णालयात दाखल केले. छावणी पोलिसांनी अबुलाल हश्मी, अबुल हश्मी, मोहसीन हश्मी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर करत आहेत.