छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा आज, ३० सप्टेंबरला दुपारी १२ च्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने त्या बचावल्या आहेत. त्यांच्या गाडीला पिकअप वाहनाने समोरून धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही घटना धुळे-सोलापूर महामार्गावर चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे घडली.
माजी जिल्हा परिषद सदस्या असलेल्या संजना जाधव आपल्या सहकाऱ्यांसह कन्नडहून नागदजवळील बनोटीकडे गावभेट दौऱ्यानिमित्त जात होत्या. रांजणगाव फाट्याजवळ समोरून येणारी पिकअप वाहनाने चुकीच्या बाजूने भरधाव येत संजना जाधव यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात संजना जाधव आणि त्यांच्या सोबतचे सहकारी थोडक्यात बचावले. पिकअप वाहनचालकसुद्धा सुरक्षित आहे. संजना जाधव यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क केला असता, गाडीतील आम्ही सर्व जण सुखरूप असून सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही, असे त्यांनी सांगितले.
संजना जाधव या कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू असून, गावागावात जाऊन त्या मतदारांच्या भेटीगाठी घेऊन वातावरणनिर्मिती करत आहेत. गावभेट दौऱ्यावर असतानाच हा अपघात झाला. दरम्यान, कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यापासून संजना जाधव यांनी घटस्फोट घेतलेला आहे. त्यानंतर आता कन्नड विधानसभा निवडणुकीत हे माजी पती-पत्नी एकमेकांविरोधात मैदानात उतरणार असल्याचे चित्र आहे.