छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव स्कुटीस्वाराने समोर धावणाऱ्या स्कुटीला मागून धडक दिली आणि पसार झाला. यात सेंट्रींग कामगार जखमी झाला असून, सिडको एमआयडीसी पोलिसांनी धडक देणाऱ्या स्कुटीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जालना रोडवरील धूत हॉस्पिटलसमोर रविवारी (२९ सप्टेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
नीलेश साहेबराव जाधव (वय ३४, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, की ते सेंट्रींग काम करतात. रविवारी (२९ सप्टेंबर) सकाळी ९ च्या सुमारास ॲक्टिवा स्कुटीने (MH 20 GT 0087) जालना रोडने चिकलठाणा परिसरातील केंब्रिजकडे कामावर जात असताना साडेनऊला धूत हॉस्पिटलसमोर आले असता मागून पांढऱ्या स्कुटीच्या चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे जाधव हे २० ते २५ फूट फरपटत गेले. यात त्यांच्या उजव्या हाताला व पायाला गंभीर मार लागून ते जखमी झाले. स्कुटीचालक न थांबता तेथून भरधाव निघून गेला. जाधव यांच्या स्कुटीचेही नुकसान झाले आहे. जाधव यांना नारायण गोरे यांनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचार घेऊन जाधव हे पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आले असता पोलिसांनी त्यांची अवस्था पाहून मेडिकल मेमो देत घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवले. या प्रकरणात जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात स्कुटीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार राजू कोतवाल करत आहेत.