वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : भिवगाव (ता. वैजापूर) येथे शासनाची परवानगी न घेता ग्रामपंचायतीमागे मोकळ्या जागेत एकलव्यांचा अश्वारुढ पुतळा बसवला आहे. गावात कुणी याबद्दल काहीच न सांगितल्याने ग्रामसेविका रंजना सोनवणे (रा. लक्ष्मीनारायणनगर, वैजापूर) यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध २६ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला आहे.
२२ सप्टेंबरला सकाळी ११ ला रंजना सोनवणे भिवगाव ग्रामपंचायतीत आल्या असता ग्रामपंचायत कर्मचारी आकाश वाघ (रा. भिवगाव) त्यांना सांगितले की, ग्रामपंचायतीच्या जागेत एकलव्यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आहे. त्यानंतर सरपंच दीपाली ज्ञानेश्वर गायके, उपसरपंच रामभाऊ गायके, ग्रा. पं. सदस्य कांतीलाल पठारे (ग्रामपंचायत सदस्य) यांच्यासह जाऊन पाहणी केली असता पुतळा बसवलेला दिसला. २१ सप्टेंबरच्या रात्री १० नंतर दुसऱ्या दिवशीच्या सकाळी ६ पर्यंत अज्ञात व्यक्तींनी शासनाची परवानगी न घेता पुतळा बसविला असल्याचे समोर आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे करत आहेत.