छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अंमलीपदार्थ विरोधी पथकाने दोघांना पकडून सव्वा सहा किलो गांजा जप्त केल्याची कारवाई मुकुंदवाडीतील झेंडा चौकाजवळ आणि नारेगावातील आनंद गाडेनगरात केली. ओडिशासह विशाखापट्टणम येथून त्यांनी गांजा विकण्यासाठी आणला होता.
पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना दोन ठिकाणी गांजा विक्रीसाठी आणला गेल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या पथकाने मुकुंदवाडीतील झेंडा चौकाजवळ अतुल सोळंके (रा. साईराजनगर, मुकुंदवाडी) याला ताब्यात घेतले. त्याने ओडिशाहून विक्रीसाठी आणलेला १ किलो १४५ ग्रॅम वजनाच्या १५६ पुड्या गांजा जप्त करण्यात आला. पोलीस अंमलदार विजय त्रिभुवन यांच्या तक्रारीवरून अतुलविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
त्यानंतर पथकाने नारेगावातील आनंद गाडेनगरात नंदू नेहरू तामचीकर (वय ६०) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५ किलो १७९ ग्रॅम गांजा मिळून आला. हा गांजा त्याने विशाखापट्टणम येथून विक्रीसाठी आणला होता. या दोन्ही कारवाई पोलीस निरीक्षक बागवडे यांच्यासह पोलीसउपनिरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार विजय त्रिभुवन, महेश उगले, सतीश जाधव, संदीपान धर्मे, छाया लांडगे, नितीन सुंदर्डे आणि पठाण यांनी केली.