छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नवरात्रोत्सव गुरुवारपासून (३ ऑक्टोबर) सुरू होत आहे. या ९ दिवसांत शहरातील प्रसिद्ध कर्णपुऱ्यातील तुळजाभवानी मातेची यात्रा भरत असते. छावणी परिषदेच्या ४० एकर जागेवर भरणाऱ्या यात्रेत १,२०० वर दुकाने थाटली जाणार असून, यंदा १२ लाखांवर भाविक दर्शनासाठी येणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन नियोजन करत आहे.
देवी मंदिर ते मुख्य रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. आ. अंबादास दानवे यांच्या निधीतून हा रस्ता तयार करण्यात आला आहे. यात्रेत दुकाने लावण्यासाठी राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातील व्यापारी येतात. व्यापारी आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था चार विहिरींतून करण्यात आली आहे. स्वयंपाक आणि दैनंदिन वापरासाठी या पाण्याचा वापर होईल. ६ मोबाइल टॉयलेट व्हॅन्सही उपलब्ध करून दिल्या जातील.
यात्रेत २५० डस्टबिन ठेवल्या जातील. कॅरीबॅगवर पूर्णपणे बंदी करण्यात आली असून, तशी सूचना दुकानदारांना करण्यात येत आहे. सुरक्षा व्यवस्थाही कडक राहणार आहे. पोलिसांच्या ४ चौक्या आणि ४ टॉवर पॉइंट असतील. १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे यात्रेत सर्वांना नजर ठेवली जाईल. अग्निशमन विभागाचे वाहनही तैनात असेल. तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी म्हणून छावणी परिषदेने प्रथमोपचार केंद्रही सुरू करण्याचे नियोजन केले आहे. धूत हॉस्पिटलचेही प्रथमोपचार केंद्र सुरू राहणार असून, नऊही दिवस रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे.
शहराची ग्रामदेवता म्हणून कर्णिका माता देवीची ओळख आहे. सतराव्या शतकात मोगलांच्या सैन्यासह १८३५ मध्ये आलेले बिकानेर महाराजा कर्णसिंह यांनी शहराबाहेर खामनदीला लागून छावणी टाकली. हा भाग पुढे त्यांच्याच नावे “कर्णपुरा’ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांनी या ठिकाणी कुलदेवता भवानीदेवीची स्थापना करून मंदिर उभारले. राजस्थानी शैलीतील या मंदिराचा १९८२ मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला. देवीची पूजाअर्चा करणारी दानवे कुटुंबाची सध्याची सातवी पिढी आहे. या ठिकाणचे बालाजी मंदिरही तितकेच पुरातन आहे. कर्णसिंहांची मुले पद्मसिंग आणि केसरसिंग यांच्या नावानेही जवळच पुरे वसले आहेत. यातील केसरसिंहांनी स्थापन केलेले रेणुकामाता मंदिरही शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कर्णपुरा यात्रा ही शहरातील पहिली, एकमेव आणि सर्वात मोठी यात्रा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही यात्रा भरते.