सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : धोत्रा (ता. सिल्लोड) येथे रविवारी (२९ सप्टेंबर) दुपारी दोनला मोफत आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी एक जण दारू पिऊन गोंधळ घालत होता. त्याला पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे पूत्र तथा सिल्लोडचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या सुरक्षारक्षकाने आवरण्याचा प्रयत्न केल्याने धक्काबुक्की होऊन राडा झाला. त्यानंतर हा कार्यक्रमच ग्रामस्थांनी उधळून लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. मात्र या अब्दुल समीर यांनी वृत्ताचे खंडन केले असून, हा कार्यक्रम उधळून लावल्याची व गाडी फोडल्याची विरोधकांकडून अफवा पसरवली जात आहे. हे सर्व खोटे आहे, असे ते म्हणाले.
नक्की काय घडले?
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत शिधा वाटपाच्या कार्यक्रमाला ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या प्रमाणावर हजर होते. कार्यक्रमात एक व्यक्ती दारू पिऊन गोंधळ घालत असताना अब्दुल समीर यांच्या सुरक्षारक्षकाने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. दोघांत धक्काबुक्की झाल्याच्या कारणावरून कार्यक्रमात गोंधळ उडाला. त्यानंतर ग्रामस्थांनी हा कार्यक्रम उधळून लावल्याचा व्हिडीओ दिवसभर सोशल मीडियावर फिरला. तालुक्यात ही चर्चा सुरू झाल्यानंतर अब्दुल समीर खुलासा केला. ते म्हणाले, की पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी धोत्रा गावासाठी व मंदिरासाठी मोठा निधी दिला आहे. अनेक विकासकामे गावात सुरू असल्याने विरोधकांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे बदनामी करत आहेत.