छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रेम डोक्यात शिरलेला २५ वर्षीय तरुण प्रेयसीच्या पतीला जीवे मारण्यासाठी बंदूक घेऊन निघाला. पण खबऱ्यामार्फत मुकुंदवाडी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई रविवारी (२९ सप्टेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास संघर्षनगर परिसरातील विमानतळाच्या भिंतीलगत करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी पिस्तूल, गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस आणि मॅगझिन असा सुमारे ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आकाश रमेश झिने (२५, रा. हर्षी, ता. पैठण, ह. मु. राजनगर, मुकुंदवाडी) असे पकडण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेयसीच्या पतीला मारण्यासाठी शस्त्र खरेदी केल्याची कबुली त्याने पोलिसांत दिली. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे हे सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना त्यांना खबऱ्यामार्फत संघर्षनगर परिसरातील गणपती मंदिराजवळ एक व्यक्ती शस्त्रांसह असल्याची माहिती दिली. श्री. घोरपडे यांनी लगेचच सहकाऱ्यांसह धाव घेतली. संशयित तरुण हॉटेल इच्छामणीकडून संघर्षनगर गणपती मंदिराकडे येत असतानाच त्याच्या मुसक्या आवळल्या. प्रेयसीच्या पतीला संपवून टाकण्यासाठी शस्त्र खरेदी केल्याचे त्याने सांगितले. ऐनवेळी पोलिसांनी त्याला अटक केल्याने त्याचा कट फसला आहे. ही कारवाई बाबासाहेब कांबळे, नरसिंग पवार, गणेश वैराळकर यांच्या पथकाने केली.