छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि फुलंब्रीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक लुडबूड करू लागल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनीही छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघावर दावा सुरू केला आहे. यासाठी गेल्या काही निवडणुकांचे दाखले दिले आहेत. या मतदारसंघात भाजपचा मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याचा दावाही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ठाकरे गटाकडून राजू शिंदे यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू असताना, त्यातच भाजप पदाधिकाऱ्यांनी जागेवर दावा ठोकल्याने आ. संजय शिरसाट यांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.
काय आहे दावा…
पश्चिम मतदारसंघ भाजपसाठी पूरक असून भाजपला मानणारा मोठा मतदारवर्ग या मतदारसंघात आहे. २०१४ मधील निवडणुकीत भाजपचे उमेदवार मधुकर सावंत यांचा अवघ्या ३५०० मतांनी पराभव झाला होता. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांना ४० हजारांहून अधिक मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीतही शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांना भाजपची मते मिळाल्याने त्यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. पक्षाने उमेदवार दिल्यास मोठ्या मताधिक्याने भाजपचा उमेदवार निवडून येईल. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजपचे शहर सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांनी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यामार्फत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. गंगापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतीश चव्हाण आणि फुलंब्रीतून शिंदे गटाचे किशोर बलांडे तयारी करत असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी पश्चिमवर दावा ठोकल्याचे दिसून येत आहे.