छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाचा धागा पुरविण्याचा उद्योग करत असल्याचे सांगत चिराग विनोदकुमार पित्ती व प्रवीण शेली (दोघेही, रा. मुंबई) या दोघांनी शहरातील प्रसिद्ध उद्योजक श्याम अग्रवाल (वय ४५) यांना १२ कोटी ६४ लाख रुपयांचा गंडा घातला.
अग्रवाल यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यानंतर सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अग्रवाल यांच्या रिद्धी सिद्धी कॉटेक्स प्रा. लि. व ऋषी फायबर्स प्रा. लि. या कंपन्या आहेत. २०१८ मध्ये त्यांना चिराग व प्रवीणने संपर्क केला होता. त्यांच्यातील करारानुसार कापसाच्या पुरवठ्यानंतर १५ दिवसांत पैसे अदा करण्याचे ठरले होते. उशीर झाल्यास १८ टक्के दराने रकमेवर व्याज ठरले होते. २०१८ ते २०२२ दरम्यान अग्रवाल यांनी त्यांना कापसाच्या गाठींचा पुरवठा केला. मात्र दोघांनी पैसे थकवणे सुरू केले.
अग्रवाल यांनी १४ कोटी ८८ लाखांच्या जवळपास पाच हजार क्विंटल कापसाच्या गाठी पाठवल्या होत्या. चिराग व प्रवीणने मालाचा धागा तयार करून विक्री केल्याचे अग्रवाल यांनी म्हटले आहे. अग्रवाल यांना त्यांच्या गोडावूनमध्ये माल आढळला नाही. दोघांनी उलट अग्रवाल यांनाच सांगितले, की तुम्ही आम्हाला असा कुठलाच माल पाठविला नाही. त्यामुळे अग्रवाल हैराण झाले.