वैजापूर (गणेश निंबाळकर : सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूरचे माजी नगराध्यक्ष, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी बुधवारी (२५ सप्टेंबर) अखेर शिवबंधन बांधले. मुंबईत मातोश्रीवर त्यांनी समर्थकांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत ते ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार मानले जातात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांची उपस्थिती होती.
डॉ. परदेशी यांनी यापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर वैजापूरमधून दोनदा विधानसभा निवडणूक लढवली होती. वैजापूर नगरपालिकेवर २००१ पासून डॉ. दिनेश परदेशी यांची एकहाती सत्ता आहे. काही दिवसांपासून ते ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा होती. १४ सप्टेंबरला वैजापूरला मेळावा झाला, त्यात ते पक्षप्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र ते या मेळाव्यापासून दूर राहिले होते. त्यामुळे ते ठाकरे गटात जाणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. अखेर बुधवारी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश झाला.
बाजार समिती सदस्य, माजी नगरसेवक, ग्रामपंचायत, खरेदी विक्री संघाच्या अनेक सदस्यांनीही डॉ. परदेशी यांच्यासोबत ठाकरे गटात प्रवेश केला. या वेळी शिवसेना नेते विनायक राऊत, उपजिल्हा प्रमुख अविनाश गलांडे, तालुकाप्रमुख सचिन वाणी, प्रकाश चव्हाण आदींची उपस्थिती होती. वैजापुरातील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आ. रमेश बोरनारे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. त्यावरून आ. बोरनारे यांनीही ठाकरेंवर शरसंधान साधले होते. विधानसभा निवडणुकीत आ. बोरनारे आणि डॉ. परदेशी अशी लढत पहायला मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.