छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटप कसे असेल, यावर मंगळवारी (२४ सप्टेंबर) उशिरापर्यंत खलबते झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील बैठक मध्यरात्री १ ला संपली. सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच निर्णयाची घोषणा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.
संघाचा सल्ला दुर्लक्षित करून विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांना सोबत घेण्यावर अमित शहा ठाम असल्याचे दिसून आले. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली. बैठकीला प्रफुल्ल पटेल, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव हेही उपस्थित होते. विधानसभेची रणनीती, सामाजिक आंदोलने, जागा वाटप, विरोधकांचे मुद्दे यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठक संपल्यावर रात्री १ च्या सुमारास मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हॉटेलमधून बाहेर पडले. विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रकारांनी गाठले. यावेळी ते म्हणाले, की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही सुरुवातीपासूनच सकारात्मक आहोत. जे होईल ते समन्वयाने होईल. जागा वाटपावर लवकरच निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.