छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातून ३ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रकार समोर आला आहे, तर सोयगाव तालुक्यातील वडगाव तिग्जी येथून साडेचौदा वर्षांच्या मुलीला तरुणाने पळवून नेल्याची तक्रार बनोटी पोलीस चौकीत करण्यात आली आहे.
सन्मित्र कॉलनीतून १५ वर्षीय मुलीचे अपहरण…
समतानगरात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेने क्रांती चौक पोलीस ठाण्यात आपल्या १५ वर्षीय मुलीचे सन्मित्र कॉलनीतून अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे. महिला एका दवाखान्यात काम करते. २३ सप्टेंबरला ती मुलीला सोबत घेऊन दवाखान्यात आली होती. मुलीला रिसेप्शनला बसवून एका रुग्णाला आतमध्ये सोडण्यासाठी गेली. परत आली तर मुलगी गायब होती. बाथरूमला गेल्याच्या संशयाने बाथरूमकडे पाहणी केली असता तिथेही मुलगी नव्हती. तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली असता त्यांच्याकडेही मुलगी गेली नव्हती. तिचे कुणीतरी अपहरण केल्याच्या शक्यतेने महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मुलगी स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये अकरावीत शिकते.
उल्कानगरी, उस्मानपुऱ्यातून २ मुली गायब…
देवगिरी कॉलेजमधून घरी परतताना १७ वर्षीय मुलगी मैत्रिणीसह पायी तिच्या शहा कॉलनीतील घरी गेली. तिथून घरी उस्मानपुऱ्या येण्याऐवजी बेपत्ता झाली आहे. मुलीच्या वडिलांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली आहे. २१ सप्टेंबरला सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली आहे. मुलीच्या वडिलांनी मुलीचा कॉलेजमध्ये शोध घेतला. नातेवाइकांकडे विचारपूस केली. मात्र ती मिळून आली नाही. अखेर उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली.
उल्कानगरीतील खिवंसरा पार्कमधील १७ वर्षीय मुलीला वडिलांनी देवानगरीतील क्लासेसमध्ये २२ सप्टेंबरला सकाळी पावणेनऊला साेडले. दुपारी साडेतीनला मुलगी घरी परत येते. पण ती परत न आल्याने मुलीच्या आईने पतीला सांगितले. त्यानंतर आई-वडिलांनी मुलीचा शोध सुरू केला. तिच्या क्लासेसमध्ये विचारणा केली. नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र मुलगी कुठेच नव्हती. अखेर उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
तो नेहमी घरी यायचा अन् एकेदिवशी…
सोयगाव तालुक्यातील वडगाव तिग्जी येथे विधवा महिला दोन मुली आणि एक मुलगा यांच्यासह राहते. मोलमजुरी करून पोट भरते. १८ सप्टेंबरला रात्री सर्व जण जेवण करून झोपी गेले. १९ सप्टेंबरला पहाटे पाचला महिलेला जाग आली असता साडेचौदा वर्षीय मुलगी पलंगावर नव्हती. लघुशंकेला गेली असेल असे समजून महिलेने वाट पाहिली. मात्र बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने गावात तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. महिलेला राज नावाच्या तरुणावर संशय आहे. कारण गेल्यावर्षी पिंप्राळे (ता. नांदगाव) येथे ऊसतोडीसाठी ती गेली असता तिथे राज नावाच्या मुलासोबत महिलेची ओळख झाली होती. ऊसतोडीनंतर गावी परतल्यावरही तो वडगाव तिग्जी येथे भेटायला येत होता. यातूनच त्याने मुलीला जाळ्यात ओढून फूस लावून पळवल्याचा संशय महिलेने व्यक्त केला आहे. बनोटी पोलीस चौकीत महिलेने तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.