छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाड्यासमोर दुष्काळ, पाणीटंचाई, अपुरे मनुष्यबळ, शेतकरी आत्महत्यासारखी अनेक आव्हाने आहेत. त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही नवनियुक्त विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बुधवारी सकाळी गावडे यांनी मराठवाडा विभागीय आयुक्तपदाची सूत्रे प्रभारी आयुक्त जगदीश मिनियार यांच्याकडून स्वीकारली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, उपायुक्त नयना बोंदर्डे, सुरेश बेदमुथा यांनी गावडे यांचे स्वागत केले.
काय म्हणाले नवे आयुक्त…
-पाऊस बरा झाला आहे. येणाऱ्या काळात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे.
-टंचाईसाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल.
-महसूल सुनावण्यांची प्रकरणे प्रलंबित असतील तर त्यावर निर्णय होईल.
-रोहयो, सामान्य प्रशासनाची, पीक कर्ज, विमा संबंधित प्रकरणांकडे लक्ष देण्यात येईल.

राष्ट्रवादी काँग्रेसने दिले निवेदन…
गावडे यांनी पदभार घेताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. राजेश टोपे यांनी विभागीय आयुक्तालयात येऊन पीककर्ज, पीकविमा, टंचाई, अनुदानाबाबत निवेदन दिले. मागच्या वर्षीचे अनुदान मिळालेले नाही. विमा कंपन्यांनी अनेकांना विमा दिला नाही. ‘रोहयो’ची कामे सुरू आहेत, कामे पूर्ण झाली, परंतु रोहयो आयुक्तांनी पैसे दिलेले नाहीत. पाण्याची टंचाई ग्रामीण भागात आहे. बँका पीककर्ज देत नाहीत. सिबील बघू नका, असे शासनाने सांगितले तरी बँका ऐकत नाहीत. कर्ज वाटपाचे लक्ष्य पूर्ण होण्याची साशंकता आहे. अनेक खाते होल्ड केलेले आहेत. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहेत.