छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कांचनवाडी परिसरातील मिडोज हिल मिस्ट या गृहप्रकल्पातील ग्राहकांकडून वन टाइम मेंटेनन्सचे सुमारे ३ कोटी रुपये हडपल्याचा गुन्हा दाखल असलेल्या बिल्डर रमेश बोधराज नागपाल (वय ६५, आरटीओ रोड, शिल्पनगर, रा. पदमपुरा) याच्याविरुद्ध घरातील २७ वर्षीय मोलकरणीने बलात्काराची तक्रार वेदांतनगर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यावरून पोलिसांनी नागपालविरुद्ध गुन्हा दाखल करून शनिवारी (२१ सप्टेंबर) त्याला अटक केली.
तक्रारदार तरुणी मूळची उत्तरप्रदेशातील झाशीची असून, काही वर्षांपासून पती, मुलासह शहरात राहते. बिल्डर रमेश नागपाल याने पेपरमध्ये दिलेली जाहिरात वाचून कामासाठी हे दाम्पत्य त्याच्याकडे आले. नागपालने २० मार्च २०२४ रोजी तिच्या पतीला बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून नेमले, तर तिला घरकामासाठी नेमले. मात्र तिच्यावर नागपालची नियत फिरली. यातूनच त्याने तिच्या पतीला बंगल्याच्या सुरक्षेऐवजी महावीर चौकातील बिल्डिंगच्या सुरक्षेसाठी पाठवले. तरुणी नागपालच्या घरात स्वयंपाकात मदतीसह धुणे, भांडी करत होती. हे दाम्पत्य बंगल्यामागे दोन खोल्यांत राहत होते.
एप्रिलमध्ये तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न फसला…
एप्रिल महिन्यात एकेदिवशी सकाळी ९ ला तरुणी घरात साफसफाई करत असताना नागपालची पत्नी अंघोळीसाठी गेली होती. ही संधी नागपालने तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. तिच्यासोबत अश्लील कृत्य करत १ लाख रुपये देतो, शरीरसंबंध ठेवू दे, असे त्याने म्हटले. नवऱ्याला काही सांगू नको, असे तो म्हणाला. पण तिने त्याची ऑफर मान्य केली नाही.
४ जूनला वासना शमवलीच…
४ जून २०२४ रोजी तरुणी नागपालच्या बेडरूममध्ये कपडे ठेवण्यासाठी आली असता त्याने तिला बेडवर ओढले. तिने विरोध केला असता त्याने तुझ्या मुलांचे शिक्षण चंागल्या शाळेत करून देतो, माझ्याकडे खूप पैसे आहेत, असे म्हणत तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणीने मी हे माझ्या पतीला सांगेन, असे म्हटले असता त्याने धमकावले की तुझ्या पती व मुलाला मारून डोंगरात फेकेन… त्यामुळे विवाहिता घाबरून गेली होती.
पुन्हा पुन्हा बलात्कार करत राहिला…
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जामिन मिळाल्यानंतर घरी आलेल्या रमेश नागपालने १३ सप्टेंबरला पाणी मागण्याच्या बहाण्याने तरुणीला बोलावून पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून पतीला तिने आपण हे काम सोडून जाऊ, असे सांगितले. मात्र पतीला संशय आल्याने त्याने तिची कसून चौकशी केली असता तिने नागपालच्या वासनेचा पाढा वाचला. त्यानंतर दाम्पत्याने वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी नागपालविरुद्ध गुन्हा दाखल करून शनिवारी त्याला अटक केली.
व्हिडीओ कॉल करून वकिलाकडून युवतीला शरीरसंबंधाची मागणी
व्हिडीओ कॉल करून युवतीला शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी श्यामसुंदर हरिभाऊ वाघ (रा. लक्ष्मी कॉलनी, सम्राट अशोकनगर, गल्ली नंबर २, छावणी) या वकिलाविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आंबेडकरनगरातील युवतीच्या तक्रारीनुसार १६ ऑगस्टला दुपारी दोनच्या सुमारास आणि १७ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्यामसुंदरने तिला व्हिडीओ कॉल करून अंगावरील कपडे काढत शरीरसुखाची मागणी केली. तू माझ्यावर केलेली बलात्काराची केस परत घे, नाही तर तुझे एक घाव दोन तुकडे करेन, तुझ्यावरच ब्लॅकमेलची केस करेल, अशी धमकीही दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सिडको पोलीस करत आहेत.
वैजापूरमध्ये महिलेचा विनयभंग
वैजापूर शहरात ३३ वर्षीय महिलेचा चौघांनी विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी (२० सप्टेंबर) सायंकाळी घडली. महिला घरात असताना दानी शेख (रा. दर्गाबेस, वैजापूर), शाहरूख खान, रिहान अय्युब शेख व रिहाने शेख (सर्व रा. कादरीनगर, वैजापूर) यांनी तिला घराबाहेर बोलावून विनयभंग केला. महिलेच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.