वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूरमध्ये शिवसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आ. रमेश बोरनारे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. त्यांच्या टीकेला करंजगावच्या कार्यक्रमात आ. बोरनारे यांनी प्रत्युत्तर देताना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी तुम्हाला काँग्रेसबरोबर आघाडी करताना पाहिलं असतं तर त्यांनीच तुम्हाला उलटं टांगलं असतं, असे शरसंधान ठाकरेंवर साधले होते. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघातून पैसे घेऊन उमेदवारी देण्याचा घाट उद्धव ठाकरे यांनी घातला होता, असा गंभीर आरोपही केला. त्यामुळे वैजापूरचे राजकारण तापले असून, ठाकरे गटाला आ. बोरनारेंचे आरोप फारच जिव्हारी लागले आहेत. ठाकरे गटाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शुक्रवारी सकाळी आ. बोरनारे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. एका कार्यकत्याने तर थेट आ. बोरनारे यांना कॉल करून थेट लायकीच काढली. त्याची ऑडिओ क्लिपही व्हायरलही केली.
घोषणाबाजी करून आ. बोरनारेंचा निषेध
वैजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शुक्रवारी सकाळी ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी आ. बोरनारे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी उपजिल्हा प्रमुख अविनाश गलांडे, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहर प्रमुख प्रकाश चव्हाण, युवा सेना जिल्हाप्रमुख विठ्ठल डमाळे, अॅड. रमेश सावंत, अंकुश सुंभ, भाऊसाहेब गलांडे, अॅड. एकनाथ कुंजीर, नंदकिशोर जाधव, रवींद्र पगारे, मनोज गायके, विलास धने, जितेंद्र जगदाळे, श्रीकांत साठे आदींची उपस्थिती होती.
कार्यकर्त्याने कॉल करून काढली लायकी…
लाडगाव येथील मच्छिंद्र बेरड या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने आ. बोरनारे यांना कॉल करून थेट लायकी काढल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघांच्या संभाषणाची ‘ऑडिओ क्लीप’ सध्या व्हायरल होत आहे. त्याची पुष्टी छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज करत नाही. या कार्यकर्त्याने आ. बोरनारे यांना सुनावत, उद्धव ठाकरेंवर बोलायची तुमची लायकी आहे का, आज बाळासाहेब ठाकरे असते तर तुम्हालाच चटके दिले असते, अशी भाषा वापरली. या संवादात दोघांत खडाजंगी झालेली पाहायला मिळते. ‘क्लीप” मधील फोन लावणारा कार्यकर्ता मच्छिंद्र बेरड असल्याचे तसेच समोरील आवाज हा आ. रमेश बोरनारे यांचा असल्याचा दावा तालुक्यात केला जात आहे. याबाबत क्लिपबाबत आमदार बोरनारे यांच्याशी संपर्क करण्याच प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.